चंद्रपूर प्रतिनिधी
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) चंद्रपूर पथकाने शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) केलेल्या सापळा कारवाईत चंद्रपूर महानगरपालिका येथील स्थापत्य अभियंता शुभम नंदकिशोर वरघट (३०) व त्याचा सहकारी खाजगी इसम दिनेश दिलीप समद्दर (३७) यांना १ लाख ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम नियंत्रण विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तक्रारदाराचा भंगाराम वॉर्ड परिसरात भंगार व्यवसाय असून त्यांनी २०२० मध्ये ईराई नदीकाठावरील सुमारे १२०० चौ.फुटांची बांधकामासह जागा खरेदी केली होती. जुन्या बांधकामाचा पाडाव करून त्यांनी त्या जागेभोवती कंपाउंड व टिनशेड उभारून भंगार साठवण सुरू केली. मात्र मागील भूखंडधारकास रस्त्याची अडचण होत असल्याची तक्रार महानगरपालिकेकडे झाल्यानंतर तक्रारदारास नोटीस बजावण्यात आली होती.
या संदर्भात १४ फेब्रुवारी रोजी तक्रारदाराने अभियंता वरघट (अतिरिक्त कार्यभार : अतिक्रमण विभाग, पंतप्रधान आवास योजना) व समद्दर यांची भेट घेतली असता, बांधकाम न तोडण्यासाठी ३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. चर्चेनंतर ही रक्कम २.३० लाखांवर ठरली. त्यातील १ लाख रुपये १७ फेब्रुवारी रोजी समद्दर यास देण्यात आले होते.
उर्वरित रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २० फेब्रुवारी रोजी एसीबीकडे तक्रार केली. पडताळणीनंतर २१ फेब्रुवारी रोजी सापळा रचण्यात आला. वरघट यांच्या सांगण्यावरून समद्दर याने १.३० लाख रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने त्यास रंगेहात पकडले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई एसीबी नागपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर व उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन धर्मेजवार व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.


