मुंबई प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभर उमटलेल्या शोकलहरींमध्ये राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या अपघाती मृत्यूभोवती निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणात जर ‘घातपात’ाची ठिणगी पडली असती, तर महाराष्ट्र अस्थिरतेच्या ज्वाळेत सापडला असता, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते भास्कर जाधव यांनी दिला.
बारामतीतील दुर्घटनेनंतर जनमानसात तीव्र संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘घडली की घडवली’ अशी कुजबुज सर्वदूर होती. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हा घातपात नसून अपघात आहे’ असे स्पष्ट विधान करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, असे जाधव म्हणाले. त्या विधानामुळे संभाव्य अस्थिरता टळली, असा त्यांचा दावा आहे.
‘स्फोटक’ वातावरण शांत करण्यासाठी विधान
अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना जाधव म्हणाले की, काही नेत्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असताना शरद पवार यांनी अपघाताचे मत व्यक्त केले. हे विसंगत नव्हते; उलट राज्यात उद्भवू शकणारी गंभीर स्थिती टाळण्यासाठी ते आवश्यक होते. “त्या दिवशी ठिणगी पडली असती तर राज्यभर वणवा भडकला असता आणि कोणालाही नियंत्रण ठेवणे कठीण झाले असते,” असे त्यांनी नमूद केले.
‘महाराष्ट्राचा आधारवड’ हरपला
अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करताना जाधव म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात उमललेले ब्रह्मकमळ करपून गेले. करारी, कर्तव्यदक्ष आणि आश्वासक आवाज कायमचा हरपला.” आरोप-प्रत्यारोपांमध्ये न खचता कामावर लक्ष केंद्रित करणारे नेतृत्व दुर्मीळ असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सडेतोड निर्णयक्षमता
काम शक्य असल्यास ‘होय’ आणि शक्य नसल्यास स्पष्ट ‘नाही’ सांगण्याचे नैतिक धैर्य अजित पवार यांच्याकडे होते, असे जाधव म्हणाले. राजकीय परिणामांची जाणीव ठेवूनही प्रशासनिक निर्णय स्पष्टपणे मांडण्याची त्यांची शैली वैशिष्ट्यपूर्ण होती.
‘फणसासारखे’ व्यक्तिमत्त्व
“वरून काटेरी भासणारे पण आतून मधाळ व संवेदनशील,” अशी उपमा देत जाधव यांनी अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख केला. अध्यक्षपदाचा सन्मान राखण्याची त्यांची वृत्ती आणि सार्वजनिक जीवनातील संस्कारशीलता यांचा त्यांनी गौरव केला.


