मुंबई प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत नेते अजित पवार यांना दोन्ही सभागृहांत शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक शब्दांत प्रतिक्रिया देताना “मी माझा एक दिलदार आणि अत्यंत भरोसेमंद मित्र गमावला आहे,” असे म्हटले.
“राजकारणात अनेक जण भेटतात; परंतु काहींच्या जाण्याने पोकळी प्रकर्षाने जाणवते. महाविकास आघाडीच्या काळात अजितदादांसोबत जवळून काम करण्याची संधी मिळाली. प्रशासनाचा अनुभव नसताना त्यांनी अनुभवी, विश्वासू सहकारी म्हणून मला खंबीर साथ दिली,” असे ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडीच्या स्थापनेपूर्वी राजकीय वाटा भिन्न असतानाही दोन अनपेक्षित राजकीय घडामोडींनी आम्ही एकत्र आलो. त्या सहकार्यातून दादांचा कामकाजातील वेग, वेळेचे भान आणि निर्णयक्षमता जवळून अनुभवता आली, अशी आठवण त्यांनी सांगितली. “घड्याळ आणि वेळ यांचे प्रतीकच जणू दादा होते, वेळेत येणे, विषय मांडणे आणि निर्णयानंतर तातडीने पुढील कामाकडे वळणे,” असे ते म्हणाले.
अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा दबदबा होता, असे नमूद करताना ठाकरे म्हणाले, “दादांचे टेबल नेहमी काटकोनात, सर्व कागदपत्रे नीटनेटकी, ही त्यांची सवय होती. शिस्त आणि स्वच्छतेचा आग्रह त्यांच्या कामकाजात दिसत असे.” हीच शिस्त बाळासाहेब ठाकरे यांच्यातही असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याच्या अर्थकारणाच्या आव्हानात्मक काळात, विशेषतः कोरोना संकटात, वित्तव्यवस्था सावरण्यात आणि शेतकरी कर्जमुक्तीच्या निर्णयात अजित पवारांचा मोलाचा वाटा होता, असेही ठाकरे यांनी नमूद केले. “प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील आणि आता अजितदादा, महाराष्ट्राने अपेक्षा ठेवलेले उमदे नेतृत्व अकाली हरपले,” असे म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
अजित पवारांच्या निधनाने पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची भावना व्यक्त करत “असे मित्र आणि सहकारी पुन्हा मिळत नाहीत,” असे ठाकरे शेवटी म्हणाले.


