मुंबई प्रतिनिधी
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ करणारे बनावट औषधांचे मोठे रॅकेट मुंबई–डोंबिवली परिसरात उघडकीस आले असून नामांकित कंपनीच्या ‘टेल्मा एएम’ या औषधाच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन वितरकांना मनपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर बनावट औषधसाठा, कंपनीची बनावट लेबले आणि पॅकेजिंग साहित्य जप्त करण्यात आले असून या रॅकेटचे बिहारपर्यंत धागेदोरे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मनपाडा पोलिसांना काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत उच्च रक्तदाबासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘टेल्मा एएम’ या औषधाच्या संशयास्पद गोळ्यांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून डोंबिवलीतील ‘श्री राम फार्मा’चा मालक पंकज उपाध्याय आणि मुंबईतील वितरक विवेक राय यांना अटक केली. आरोपींकडून जप्त केलेल्या गोळ्यांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केली असता त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या बनावट गोळ्या शरीरात अपेक्षित वेळेत विरघळत नाहीत. परिणामी रक्तदाब नियंत्रणात येत नाही आणि रुग्णांना हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूतील रक्तपुरवठा बंद होऊन स्ट्रोकचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. नियमित औषधोपचारावर अवलंबून असलेल्या रुग्णांसाठी हा प्रकार अत्यंत धोकादायक असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तपासात आरोपी नामांकित औषधनिर्मिती कंपनीच्या नावाने बनावट लेबल्स व पॅकेजिंग वापरून औषधे बाजारात पुरवत असल्याचे उघड झाले आहे. औषधांचा पुरवठा मुंबई महानगर क्षेत्रासह इतर जिल्ह्यांतही झाल्याची शक्यता व्यक्त होत असून या संदर्भात पोलिसांनी औषधविक्रेत्यांकडून विक्रीची माहिती मागवण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचे धागेदोरे बिहारमधील बनावट औषध निर्मिती नेटवर्कशी जोडलेले असल्याची शक्यता तपासात समोर आली असून मनपाडा पोलिसांचे पथक संबंधित राज्यात रवाना होण्याची शक्यता आहे. बनावट औषधसाखळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
आरोग्य तज्ज्ञांनी रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेण्याचे, अधिकृत औषधदुकानांतून बिलासह खरेदी करण्याचे आणि औषधाच्या पॅकेजिंगवर संशयास्पद बाबी आढळल्यास तातडीने एफडीए किंवा पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे.
या कारवाईमुळे शहरात बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटविरोधात मोठा धक्का बसला असून पोलिस व एफडीएने संयुक्त मोहीम तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.


