धुळे प्रतिनिधी
लग्नाच्या आनंदोत्सवात किरकोळ वादातून उसळलेल्या हिंसाचाराने धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे तीन जणांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. हळदीच्या कार्यक्रमादरम्यान नवरदेव-नवरी पक्षातील पाहुण्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत व चाकूहल्ल्यात बाप-लेकासह तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी गावात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोसावी समाजातील विवाहसोहळा सुरू असताना हळदीच्या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. काही क्षणांतच हा वाद हाणामारीत परिवर्तित झाला. नवरदेवाच्या बाजूने आलेल्या काही तरुणांनी नवरीकडील मंडळींवर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुरेश सुपडुगिर गोसावी, त्यांचा मुलगा साहील सुरेशगिर गोसावी (दोघे रा. साक्री) तसेच देवा रवींद्र पवार (रा. साक्री) यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणातील संशयितांचा शोध सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांकडून होत आहे. पोलिसांकडून गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.


