स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | मध्यरात्रीच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला भोईवाडा पोलिसांनी शिताफीने अटक करून त्याच्याकडून एकूण ९ मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची किंमत सुमारे १ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्र. ०९/२०२६ नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी हे के. ई. एम. हॉस्पिटल, परेल येथे कार्यरत डॉक्टर असून ४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे १२.३० ते सकाळी ७ या वेळेत त्यांचा सॅमसंग कंपनीचा ‘ए ५४’ मोबाईल (किंमत अंदाजे १० हजार रुपये) अज्ञात व्यक्तीने चोरल्याची तक्रार त्यांनी दिली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील ४० ते ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. फिरोज इस्माईल शेख (वय ४०) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार मध्यरात्रीच्या वेळी हॉस्पिटल परिसरात येऊन मोबाईल चोरी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आठ ते दहा दिवस सापळा रचला.
१६ फेब्रुवारी रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास आरोपी मोबाईल चोरीच्या उद्देशाने परिसरात आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडून चोरीचे दोन मोबाईल आढळले. पुढील चौकशीत त्याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तपासादरम्यान त्याच्याकडून आणखी सात मोबाईल जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त, मुंबई, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), अप्पर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग), पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४), सहाय्यक पोलीस आयुक्त (भोईवाडा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ठाकुर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन महाडीक, पोउनि सचिन बोरसे, पोउनि अनिल भोंग, पो.ह. नथ्थुराम चव्हाण, पो.ह. नितीन धंगेकर, पो.ह. महादेव माळी, पो.ह. संतोष खेडेकर, पो.शि. जयदीप पाटील, पो.शि. प्रदीप राठोड, पो.शि. अविनाश सुतार, पो.शि. पंकज रोकडे, पो.शि. हेमंत सुळे आणि पो.शि. शंकर जोशी यांनी सहभाग घेतला.
सराईत आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पुढील तपास सुरू आहे.


