मुंबई/जुन्नर प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६व्या जयंतीनिमित्त राज्यभरात गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. ऐतिहासिक किल्ले, मंदिरे, शहरांतील चौक आणि गावागावांत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि शिवजागर सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले. शिवजयंतीचा मुख्य शासकीय सोहळा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर पार पडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांनी पहाटेच शिवनेरी गडावर उपस्थित राहून शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभाग नोंदविला. ढोल-ताशांच्या गजरात शिवजन्माचा पाळणा जोजवत महाराजांना अभिवादन करण्यात आले. किल्ल्यावर पारंपरिक वाद्यांच्या निनादात ‘शिवजन्म’ क्षण साकारण्यात आला.
यावेळी किल्ल्यावरील शिवाई देवी मंदिर येथे शिवाई देवी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शासकीय अभिषेक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते संपन्न झाला. पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी गडावर उसळली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवभक्तांनी जयघोष करत गड परिसर दुमदुमविला.
दरम्यान, राज्यातील विविध शहरांतही शिवजयंती उत्साहात साजरी झाली. कल्याण येथे ४२२ किल्ल्यांच्या नावांमधून शिवछत्रपतींचे तेजस्वी पोर्ट्रेट उभे करणारी अनोखी कलाकृती संशोधक-कलावंत डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी साकारली. धाराशिव येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शिवजयंती सोहळा पार पडला. देवीच्या गाभाऱ्यात सिंहासनपूजा करून शिवअभिषेक करण्यात आला. यावेळी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
सोलापुरात मराठा वस्ती परिसरातील मंडळाने सात वर्षांपासून ‘डीजेमुक्त शिवजयंती’चा उपक्रम कायम ठेवत सामाजिक संदेश दिला. डीजेवरील खर्च टाळून परिसरातील महिलांना मराठमोळ्या साडी-चोळीचा पोशाख भेट देण्याची परंपरा जपली जात आहे. या संकल्पनेचे शहरात कौतुक होत आहे. तसेच येथील चित्रकार नितीन खिलारे यांनी शिवाजी महाराजांच्या विजय मोहिमेनंतर किल्ल्याची पाहणी करतानाचा क्षण दर्शविणारे ५ बाय ८ फूट आकाराचे चित्र साकारून शिवरायांना अनोखे अभिवादन केले.
राज्यभरातील किल्ले, मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमधून शिवचरित्राची आठवण जागविण्याचा आणि मराठी संस्कृतीचा अभिमान व्यक्त करण्याचा स्वर ठळकपणे उमटला. शिवनेरीसह संपूर्ण महाराष्ट्रात “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले.


