धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात एका प्रभारी मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. महात्मा गांधी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक तानाजी विठ्ठलराव जाधव (वय अंदाजे ४५) यांनी रविवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिले पत्र
तानाजी जाधव यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. हे पत्र पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यामध्ये संस्थाचालक व काही सहकाऱ्यांकडून मानसिक छळ होत असल्याचा उल्लेख असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आले आहे. संस्थाचालकाकडून पैशांची मागणी केली जात असल्याचेही पत्रात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिक्षक संघटनांकडून चौकशीची मागणी
एका मुख्याध्यापकाला अशा परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलावे लागणे ही शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया शिक्षक संघटनांकडून व्यक्त करण्यात आली. या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व शिक्षक संघटनांनी केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी सुसाईड नोटमधील मजकुराची सत्यता पडताळण्याची प्रक्रिया सुरू केली असून, त्यात उल्लेख असलेल्या व्यक्तींची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तपासानंतर आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


