जुन्नर प्रतिनिधी
शिवनेरी किल्ला येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात रविवारी मध्यरात्रीनंतर अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान पाहण्यासाठी राज्यभरातून आलेल्या लाखो शिवभक्तांची गर्दी अरुंद प्रवेशमार्गांवर एकवटल्याने परिस्थिती काही काळ नियंत्रणाबाहेर गेली. या घटनेत महिला व लहान मुलांसह अनेक नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
महाराष्ट्र | पुणे के शिवनेरी किले पर कल रात भगदड़ में कई श्रद्धालु चोटिल हुए हैं। छत्रपति शिवाजी महाराज जयंती पर काफी भीड़ जुटी थी। ये लोग अंदर जा रहे थे। रास्ता संकरा होने से एक युवक सीढ़ियों से फिसला, फिर उनके ऊपर लोग गिरते चले गए। pic.twitter.com/MO9g3Adc7z
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) February 19, 2026
अरुंद दरवाजांवर गर्दीचा दबाव
शिवजयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवज्योत घेऊन येणारे तरुण, विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि शिवजन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी मध्यरात्रीपासून गडाच्या पायथ्यापासूनच उसळली होती. मात्र अंबरखाणा परिसरातील हत्ती दरवाजा व गणेश दरवाजा या अरुंद मार्गांवर एकाच वेळी मोठ्या संख्येने भाविक पोहोचल्याने पुढे-मागे हालचाल ठप्प झाली. काहीजण घसरल्याने व ढकलाढकली वाढल्याने चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
पोलीस बंदोबस्त अपुरा, नियोजनावर प्रश्न
घटनेनंतर स्थानिक प्रशासन व पोलीस दलाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत जखमींना खाली उतरवून रुग्णालयात हलवले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, शिवजयंतीसारख्या मोठ्या उत्सवावेळी दरवर्षी प्रचंड गर्दी होत असतानाही पुरेसा पोलीस बंदोबस्त व गर्दी नियंत्रणाचे नियोजन करण्यात त्रुटी राहिल्याची टीका होत आहे. प्रवेश-निर्गमन मार्गांचे स्वतंत्र नियोजन, टप्प्याटप्प्याने दर्शन व्यवस्था व पूर्वनियोजित गर्दी मर्यादा लागू करणे आवश्यक असल्याची मागणी व्यक्त होत आहे.
कायमस्वरूपी गर्दी व्यवस्थापनाची मागणी
घटनेनंतर शिवभक्तांमध्ये संताप व्यक्त होत असून, “इतिहासिक गडावर दरवर्षी लाखो भाविक येतात, तरीही कायमस्वरूपी गर्दी व्यवस्थापन यंत्रणा का उभारली जात नाही?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी शिवनेरीवर कायमस्वरूपी सुरक्षा व गर्दी नियंत्रण आराखडा राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


