पुणे प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (१९ फेब्रुवारी) पुणे शहरात पारंपरिक मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध सार्वजनिक उपक्रमांचा उत्साह उसळणार आहे. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याने शहरातील मध्यवर्ती भागात संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले असून काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता या मिरवणूक मार्गांवर सकाळी ७ ते कार्यक्रम समाप्तीपर्यंत सर्वसाधारण वाहतुकीवर निर्बंध राहणार आहेत. या परिसरात जड वाहनांना पूर्णत: बंदी घालण्यात आली असून नागरिकांनी शक्यतो खाजगी वाहनांसह मध्यवर्ती भागात येणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यायी मार्गांची सोय
मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांसाठी पुढील पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत-
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता: जिजामाता चौकातून येणाऱ्यांनी स. गो. बर्वे चौक – जंगली महाराज रस्ता – खंडोजीबाबा चौक – टिळक रस्ता असा मार्ग वापरावा.
गणेश रस्ता: दारूवाला पुलाकडून फडके हौद चौकाकडे जाणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातूनच वळवण्यात येईल.
बाजीराव रस्ता: पूरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्यांनी टिळक रस्ता – अलका टॉकीज चौक- फर्ग्युसन रस्ता असा मार्ग घ्यावा.
केळकर रस्ता: मिरवणूक संपेपर्यंत अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक वळवण्यात येईल; वाहनचालकांनी केळकर रस्त्याने पुढे जावे.
लक्ष्मी रस्ता: सोन्या मारुती चौकात मिरवणूक सुरू असताना वाहतूक संत कबीर चौकातून वळवण्यात येईल.
आपत्कालीन सेवांना प्राधान्य
शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असली तरी रुग्णवाहिका, अग्निशमन दल व इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांना विनाअडथळा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहतूक बदलांची दखल घेऊन प्रवासाचे नियोजन करावे व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शिवजयंतीनिमित्त मध्यवर्ती भागात गर्दीची शक्यता लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करण्याचा सल्लाही वाहतूक पोलिसांनी दिला आहे.


