हैदराबाद :
तेलंगणा राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांमध्ये सत्ताधारी काँग्रेसने ठोस आघाडी घेत शहरी भागात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मतपत्रिकेद्वारे झालेल्या या निवडणुकांमध्ये आतापर्यंत जाहीर झालेल्या ४२३ वॉर्डांपैकी काँग्रेसने २२४ वॉर्ड जिंकले असून विरोधी पक्षांना मागे टाकले आहे.
राज्यातील ११६ नगरपालिका आणि ७ महानगरपालिकांसाठी मतदान पार पडले. राज्यभरातील १२३ केंद्रांवर मतमोजणी सुरू असून बॅलेट पेपरमुळे मोजणीस अधिक वेळ लागत आहे. सुरुवातीला टपाल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली.
एकूण २,९९६ वॉर्डांपैकी १,७२८ वॉर्डांचे अधिकृत निकाल जाहीर झाले आहेत. त्यानुसार काँग्रेसने ९२३ वॉर्डांवर विजय मिळवला आहे. विरोधी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) ने ४८१ वॉर्ड जिंकले, तर भारतीय जनता पक्ष (भाजप) ला १५६ जागांवर समाधान मानावे लागले. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) ने ३० वॉर्ड जिंकले. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) ला ७ जागा मिळाल्या असून इतर पक्षांनी २४, तर अपक्षांनी १०५ वॉर्डांवर विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत सुमारे ७३ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. मतमोजणी केंद्रांवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे १२ हजार पोलीस कर्मचारी आणि रॅपिड अॅक्शन टीम तैनात करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्रांबाहेर वेबकास्टिंगची व्यवस्था केल्याची माहिती दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी १२ फेब्रुवारी रोजी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षनेते राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली होती. शहरी भागात पक्षाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. सध्याच्या कलांवरून तो अंदाज बऱ्यापैकी खरा ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.
या निकालांमुळे तेलंगणातील शहरी राजकारणात काँग्रेसची पकड अधिक बळकट झाल्याचे संकेत मिळत असून विरोधी पक्षांसाठी हा इशारा मानला जात आहे. अंतिम निकालांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तासमीकरणे अधिक स्पष्ट होणार आहेत.


