मुंबई प्रतिनिधी
किरकोळ भांडणातून २६ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करून पसार झालेल्या आरोपीला कांजूरमार्ग पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत अटक करत गुन्ह्याची उकल केली. रोहित खरात (२६) असे आरोपीचे नाव असून तो मोटारसायकलवरून पळून गेला होता. मोबाईल तत्काळ बंद ठेवल्याने तपासात अडथळे निर्माण झाले; मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्यांच्या मदतीने त्याचा माग काढत जालना जिल्ह्यातील बदनापूर येथून त्याला ताब्यात घेतले.
हर्ष ठाकूर या तरुणाची हत्या झाल्यानंतर कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तपासाला वेग देण्यात आला. परिमंडळ–७ चे पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत व भांडुप विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी कांजूरमार्ग, पंतनगर, नवघर, विक्रोळी, पार्कसाईट व घाटकोपर पोलीस ठाण्यांची पथके तयार केली.
विशेष पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सलग ३० तास शोधमोहीम राबवून आरोपीच्या मित्र-नातेवाईकांची चौकशी केली. राज्यातील विविध ठिकाणी तपासाचा विस्तार करत अखेर आरोपीचा माग काढण्यात आला. बदनापूर येथे त्याला ताब्यात घेऊन मुंबईत आणल्यानंतर अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासासाठी विशेष पथकाची मेहनत
गुन्ह्याची उकल करण्यासाठी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यातील तपासी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यापक तपास केला. पोनि (प्रशासन) अमोल कड्डू, विष्णू आव्हाड, गणेश्वर शेटे, सपोनि पाडुळे, मिथुन पाटील, राजपूत, किशोर चव्हाण, हसे तसेच एटीसी पथक व बिट मार्शल यांनी विशेष परिश्रम घेतले. तपासाला पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण, खबऱ्यांचे जाळे व तांत्रिक तपास यांच्या साहाय्याने आरोपीने लपविलेली हालचाल उघडकीस आणत कांजूरमार्ग पोलिसांनी जलद कारवाईचे उदाहरण घालून दिले.


