बंगळुरू :
पहाटेच्या शांततेला चिरत आलेल्या भीषण साखळी अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शहराबाहेरील होस्कोटे तालुक्यातील एम. सत्त्यवर गावाजवळ शुक्रवारी (ता. १३) पहाटे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अतिवेग, चालकाचे नियंत्रण सुटणे आणि त्यानंतरची समोरासमोरची धडक या सगळ्या घटनाक्रमाने काही क्षणांत सात कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
प्राथमिक माहितीनुसार, शहरातील महाविद्यालयात शिकणारे सहा बारावीचे विद्यार्थी ‘लाँग ड्राइव्ह’साठी मोटारीतून बाहेर पडले होते. नवीन महामार्गावर वेगात येत असताना त्यांच्या मोटारीने प्रथम गगन (वय २६) या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि मोटार दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या कॅन्टरला समोरासमोर धडकली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, मोटारीतील सर्व एअरबॅग्ज उघडल्या; मात्र वेग आणि आघातामुळे प्रवाशांचे प्राण वाचू शकले नाहीत.
धडकेनंतर कॅन्टर उलटला असून त्याची मागील दोन चाके वेगळी झाली. त्याचवेळी मागून येणाऱ्या आणखी एका मोटारीने रस्त्यावर पडलेल्या चाकांना धडक दिल्याने अपघाताची साखळी अधिकच वाढली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक काही काळासाठी बंद केली व पंचनामा सुरू केला.
या अपघातात मृत्युमुखी पडलेला गगन हा सॅफल कंपनीत कार्यरत होता. तो आपल्या दृष्टिहीन आईचा एकमेव आधार होता. काम आटोपून घरी परतत असताना त्याच्यावर काळाने झडप घातली.
मोटारीतील मृतांमध्ये अश्विन नायर (वय १७) याच्यासह अरहान शरीफ, अयान अली, भरत, एथन जॉर्ज आणि फरहान शेख यांचा समावेश आहे. अश्विन हा यलहंका येथील आर. व्ही. महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. मित्रांसोबत बाहेर पडताना त्याने घरच्यांना कल्पना दिली नव्हती. मुलगा खोलीत झोपला आहे, असा समज असताना सकाळी पोलिसांचा फोन आल्यावर आईला दुर्घटनेची माहिती मिळाली.
‘मुलं अभ्यास करतायत’ असा पालकांचा समज
सकाळी मुलांच्या खोल्यांमध्ये गेल्यावर बेड रिकामे असल्याचे लक्षात येताच पालकांना काहीतरी अनर्थ घडल्याची चाहूल लागली. फोनला प्रतिसाद मिळत नव्हता. रात्री उशिरापर्यंतचा भटकंतीचा बेत त्यांनी गुप्त ठेवला होता. चार कुटुंबांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या आधी मुले घराबाहेर पडली आहेत, याची त्यांना कल्पनाही नव्हती.
भरतच्या कुटुंबाला पुसटशी कल्पना
भरतने पहाटे बिर्याणी खाण्यासाठी होस्कोटेकडे जाण्याचा उल्लेख घरात सहज केला होता; मात्र तो अपेक्षेपेक्षा खूप लवकर निघून गेला. अपघाताच्या वेळी वडील कामानिमित्त बाहेर होते. बहिणींनाच काही काळ या दुःखाचा सामना करावा लागला. “तो माझ्या मुलासारखाच होता,” असे भावनिक शब्द एका बहिणीने व्यक्त केले.
आईने दिलेला इशारा
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अश्विनच्या आईला बाहेर जाण्याचा बेत समजला होता. तिने त्याला जाऊ नकोस, असे बजावले होते. रात्री तीनदा खोलीत पाहिल्यानंतर तिसऱ्यांदा तो नसल्याचे तिला आढळले. फोन केल्यावर प्रतिसाद न मिळाल्याने ती अस्वस्थ झाली. काही तासांनी पोलिसांनी मृतदेह ओळखण्यासाठी संपर्क साधला. वडील मुंबईत कामानिमित्त असल्याने शवविच्छेदनास विलंब झाला.
अयानला गाडी चालवू देत नव्हते
अपघातग्रस्त मोटार अयानच्या वडिलांची होती. अयानला वाहन चालवता येत असले तरी त्याचे पालक त्याला ड्रायव्हिंग सीटवर बसू देत नसत, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. रात्री सर्व काही सुरळीत असल्याचा भास असताना त्याने घरातून चाव्या घेतल्या आणि सहा महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या नवीन गाडीतून बाहेर पडला.
फरहानने दिले होते आश्वासन
फरहानने आईला ‘१० मिनिटांत परत येतो’ असे सांगितले होते. मात्र सकाळी ११ वाजता आलेल्या पोलिसांच्या फोनने सर्व आशा संपल्या.
दरम्यान, अपघाताचा नेमका कारणमीमांसा अहवाल येणे बाकी असून अतिवेग, अनुभवाचा अभाव आणि पहाटेची वेळ या घटकांची चौकशी सुरू आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि अल्पवयीनांकडून वाहनचालना या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सात निष्पाप जीवांच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.


