बेंगळुरू:
भ्रष्टाचाराविरोधात कारवाई तीव्र करत कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर धाड टाकत मोठे घबाड उघडकीस आणले. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती प्रकरणी कर्नाटक निवासी शैक्षणिक संस्था असोसिएशन (KREIS) चे अधीक्षक अभियंता एच. एम. जनार्दन यांच्याविरुद्ध बंगळुरू ग्रामीण लोकायुक्त पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
😱 LOKAYUKTA STRIKES BIG IN KARNATAKA!
Raids on PWD Chief Engineer Purushotham & KREIS Engineer H.M. Janardhan reveal ₹1.7 crore cash + gold hidden in homes!
Wider operation on 4 officials → ₹23+ crore assets unearthed so far.
Govt infra approvals tainted?
Probe… pic.twitter.com/ySxMk52HTM
— Akshay Kumar (@akshay_vicky) February 13, 2026
लोकायुक्तांच्या पथकाने बुधवारी व गुरुवारी एकूण सहा ठिकाणी छापे घातले. पहाटेच सुरू झालेल्या कारवाईत नोटा मोजण्यासाठी मशीन लावावी लागली; ती सततच्या वापराने गरम झाली, तर अधिकारी रबरबॅण्ड बांधून गड्ड्या तयार करताना थकले, अशी माहिती सूत्रांनी दिली. लाखो रुपयांची रोकड, मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पुरुषोत्तम यांच्या पद्मनाभनगर येथील आलिशान तीन मजली बंगल्यावरही छापा टाकण्यात आला. दोन वाहनांतून आलेल्या दहा हून अधिक अधिकाऱ्यांच्या पथकाने पाच ते सहा तास तपासणी केली. अलीकडेच बांधलेल्या या बंगल्यातील भव्य गृहप्रवेश समारंभानंतर बेहिशेबी मालमत्तेबाबत तक्रारी वाढल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
मित्राच्या घरी १.७० कोटींची रोकड
जनार्दन यांच्याशी संबंधित ठिकाणांच्या तपासणीदरम्यान त्यांच्या मित्र सुजय शेट्टी यांच्या घरावरही धाड टाकण्यात आली. तेथून तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. रोकड ठेवण्यासाठी वापरलेली कागदपत्रे व मालमत्तेशी संबंधित नोंदी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
लोकायुक्तांकडे संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. जप्त कागदपत्रांची छाननी सुरू असून, मालमत्तेचे मूल्यांकन करण्यात येत आहे. पुढील चौकशीनंतर आणखी खुलासे होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


