बेंगळुर:
कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) निवृत्त कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अवलाहळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागेश्वर राव (७५) यांनी पत्नी संध्याश्री (६५) यांचा टॉवेलने गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. सकाळी सुमारे दहाच्या सुमारास संध्याश्री आंघोळीसाठी गेल्या असताना हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. व्हाइटफिल्ड परिसरातील बोम्मनहळ्ळी भागातील ‘व्हर्चुओसो’ या अपार्टमेंटमध्ये हे ज्येष्ठ दाम्पत्य मागील तीन वर्षांपासून राहत होते. घटनेच्या वेळी त्यांची मुलगी घरी नव्हती.
घटना घडल्यानंतर राव यांनी काही परिचितांना दूरध्वनीवरून प्रकाराची माहिती दिल्याचे समोर आले आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःचे जीवन संपवण्याचाही त्यांनी विचार केला होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
चौकशीदरम्यान आरोपीने विसंगत विधाने केल्याचेही उघड झाले आहे. एका टप्प्यावर त्यांनी पत्नीनेच आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला व त्याला प्रतिउत्तर म्हणून हा प्रकार घडल्याचा दावा केला; मात्र या दाव्याची पडताळणी सुरू आहे.
संयुक्त पोलीस आयुक्त रमेश बानोत यांनी सांगितले की, संध्याश्री यांचा मृतदेह घरात आढळून आला असून नागेश्वर राव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ते इस्रोमध्ये टीम लीडर पदावर कार्यरत होते. प्राथमिक तपासात ते अलीकडच्या काळात मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
अवलाहळ्ळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून घटनेमागील नेमके कारण, आरोपीची मानसिक स्थिती आणि त्याने केलेल्या दाव्यांची सखोल चौकशी केली जात आहे.


