सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी यंदा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलेसाठी आरक्षण जाहीर झाल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चाचपणी सुरू झाली आहे. अनेक दिग्गजांच्या आकांक्षांना या निर्णयामुळे धक्का बसला असून, विविध गटांतील ओबीसी महिला सदस्यांमध्ये अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.
सध्या जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या बाजूने झुकलेली दिसत असली, तरी भाजपकडूनही प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सत्तेत असताना जिल्हास्तरावरील राजकारणातही त्याचे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आघाडी सत्तेत आल्यास…
राष्ट्रवादी काँग्रेस–शिवसेना आघाडीला सत्ता मिळाल्यास वाठार स्टेशन गटाच्या जयश्री भोसले व औंध गटाच्या मनिषा फडतरे या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. याशिवाय बुध गटातील लता कर्णे, मारुल हवेली गटातील योगिता गिरी, तसेच मल्हारपेठ गटातील विजया कुंभार यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र जयश्री भोसले व मनिषा फडतरे यांपैकी एकीला संधी मिळण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
भाजपच्या गोटातही हालचाली
भाजपला सत्ता मिळाल्यास कुडाळ गटातील जयश्री गिरी, कोडोली गटातील नीता खरात, विंग गटातील शैलजा शिंदे, काले गटातील मनिषा पाटील या संभाव्य दावेदार मानल्या जात आहेत. आंधळी गटातून सर्वसाधारण प्रवर्गातून विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या सोनल गोरे यांचाही दावा मजबूत मानला जात आहे. भाजप सत्तेत आल्यास जयश्री गिरी किंवा सोनल गोरे यांपैकी एकीची निवड होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
पूर्वीचे अध्यक्ष आणि परंपरा
जिल्हा परिषदेवर १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या काळात लक्ष्मणराव पाटील, नारायणराव पवार, जससिंगराव फरांदे, ज्योती जाधव, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, अरुणादेवी पिसाळ, माणिकराव सोनवलकर, सुभाष नरळे, हेमलता ननावरे, संजीवराजे नाईक निंबाळकर, उदय कबुले आदींनी अध्यक्षपद भूषवून विविध विकासकामांवर ठसा उमटवला.
यंदा आरक्षणामुळे ओबीसी महिलेला नेतृत्वाची संधी मिळत असल्याने स्थानिक पातळीवर उत्साहाचे वातावरण आहे. मात्र अंतिम निर्णय हा सत्ता समीकरणांवर अवलंबून राहणार असल्याने पुढील काही दिवसांत राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


