सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचे चित्र अद्याप धूसर आहे. ६५ सदस्यीय सभागृहात कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा टप्पा गाठता आलेला नसल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मिश्किल टिप्पणी करत सध्याच्या समीकरणांवर अप्रत्यक्ष भाष्य केले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, “पालकमंत्री मोठे आहेत; त्यांच्या पालकत्वाखाली आम्ही आहोत. हातात हात काय, मिठी मारायलाही तयार आहोत. मात्र त्यांना ते मान्य आहे का, ते त्यांनीच सांगावे,” अशी कोपरखळी मारली. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हलका हास्यकल्लोळ पसरला.
बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. “मला बोलावले आणि मी गेलो नाही, असे कधी झाले नाही. यापूर्वी थेट निरोप मिळाला नव्हता,” असे म्हणत भोसले यांनी सूचक टोला लगावला.
पत्रकारांनी ‘जिल्हा परिषदेत तुम्ही दोघे एकत्र येणार का?’ असा प्रश्न विचारल्यावर भोसले म्हणाले, “संख्याबळ जरी भाजपकडे अधिक असले, तरी पालकमंत्री मोठे आहेत; मोठ्यांनी सामावून घेतले पाहिजे.” दोन बैठकींना अनुपस्थित राहिल्याबाबत विचारले असता त्यांनी “तेव्हा वातावरण अनुकूल नव्हते; आता परिस्थिती बदलली आहे,” असे सांगितले. त्यावर देसाई यांनीही हसून प्रतिसाद दिला.
दरम्यान, निवडणूक प्रचारादरम्यान वैयक्तिक टीकेचा सूर लागल्याचा उल्लेख करत देसाई यांनी यापूर्वीच “अति तिथे माती” अशा शब्दांत भाजपवर नाराजी व्यक्त केली होती. पाटण मतदारसंघातील प्रचारसभांमध्ये झालेल्या वक्तव्यांवरून त्यांची नाराजी उघड झाली होती.
पक्षनिहाय बलाबल
जिल्हा परिषदेत एकूण ६५ जागा असून त्याचे पक्षनिहाय चित्र पुढीलप्रमाणे आहे –
भाजप : २३
राष्ट्रवादी काँग्रेस : २२
शिवसेना : १३
काँग्रेस : १
इतर : २
बहुमतासाठी आवश्यक असलेला ३३ चा आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आलेला नाही. परिणामी, सत्तास्थापनेसाठी आघाड्या आणि समझोत्यांच्या शक्यता तपासल्या जात आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यास सत्ता समीकरणात बदल होऊ शकतो; मात्र अंतिम निर्णयासाठी स्थानिक पातळीवरील चर्चाच निर्णायक ठरणार आहेत. साताऱ्यातील या घडामोडींकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


