मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनींना पुरविण्यात आलेल्या जेवणात अळी आढळल्याच्या गंभीर प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर कारवाई करत संबंधित कॅन्टीनचे कामकाज तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय अन्न पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचा परवाना निलंबित करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
परिचारिका प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना देण्यात आलेल्या छोले-भातात अळी आढळल्याची घटना समोर आल्यानंतर बुधवारी रात्री एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कॅन्टीनची अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन, अस्वच्छ परिसर आणि स्वच्छतेच्या निकषांकडे झालेली दुर्लक्ष स्पष्ट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तपासणीदरम्यान कॅन्टीनमधून चार विविध खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी जप्त करण्यात आले. प्राथमिक पाहणीत कॅन्टीन जीर्ण अवस्थेतील इमारतीत सुरू असल्याचे, तसेच अन्न तयार करण्याच्या ठिकाणी आवश्यक स्वच्छता आणि सुरक्षिततेचे निकष पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले.
याशिवाय कॅन्टीन परिसरात उंदीर आणि मांजरींचा मुक्त वावर असल्याचे दर्शविणारी काही छायाचित्रेही समोर आली आहेत. ही छायाचित्रे तपासणीदरम्यान काढण्यात आल्याचा दावा केला जात असला, तरी त्याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप देण्यात आलेला नाही.
दरम्यान, विद्यार्थिनींच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी भोजन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे राज्यातील सर्वात मोठ्या सार्वजनिक रुग्णालयांपैकी एक असलेल्या केईएम रुग्णालयाच्या अन्नसुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थिनींच्या आरोग्याशी झालेल्या या निष्काळजीपणाबाबत जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.


