सातारा प्रतिनिधी
गुन्ह्यात जप्त केलेली मोटार सोडून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यातील महिला हवालदाराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे सातारा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
नीता नारायण पळे (रा. क्रांतिसूर्यनगर, म्हसवड, ता. माण) असे संबंधित महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान तक्रारदाराची मोटार म्हसवड पोलिसांनी जप्त केली होती. या प्रकरणाचा तपास हवालदार पळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
जप्त वाहन सोडण्यासाठी पाच हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी पळे यांनी तक्रारदाराकडे केल्याचे सांगितले जाते. या मागणीबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी प्राथमिक पडताळणी केली असता पंचासमक्ष लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर आज दुपारी म्हसवड पोलिस ठाण्यात संबंधित महिला हवालदाराविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील पाटील, हवालदार गणेश ताटे, नीलेश राजपुरे, नवनाथ शिंदे आणि स्नेहल गुरव यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुप्रिया गावडे करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे पोलिस दलातील शिस्त व पारदर्शकतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विभागीय पातळीवर याची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


