मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या प्रशासकीय कामकाजाचे केंद्र असलेल्या मंत्रालयातच लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी सायंकाळी रंगेहात पकडले.
मंत्रालयात एका कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचून एका लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जनतेची कामे…
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) February 12, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत असलेले राजेंद्र ढेरंगे (वय अंदाजे ४५) यांनी एका तक्रारदाराकडून मेडिकल परवान्यावरील निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने आर्थिक अडचण व्यक्त केल्यानंतर ही रक्कम ३५ हजार रुपयांवर ठरल्याचे सांगण्यात येते.
तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे धाव घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी मंत्रालयात सापळा रचला. गुरुवारी सायंकाळी सुमारे ६.०६ वाजता ढेरंगे यांना ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली.
मंत्रालय परिसरातच ही कारवाई झाल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज्याच्या सर्वोच्च प्रशासकीय केंद्रात अशा प्रकारची घटना घडल्याने यंत्रणेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर टीका केली. सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मंत्रालयात एसीबीने सापळा रचून लाचखोर अधिकाऱ्याला पकडल्याची बाब गंभीर असून जनतेची कामे पैशांशिवाय होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणी अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा असून संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कलमे लावण्यात येणार, याकडे लक्ष लागले आहे.


