मुंबई प्रतिनिधी
उपनगरी लोकल प्रवासातील गर्दी, वादावादी आणि धक्काबुक्की ही नित्याची बाब असली तरी धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१२ फेब्रुवारी) रात्री उघडकीस आली. स्वतःला रेल्वे कर्मचारी असल्याचे सांगत एका इसमाने तरुणीशी लगट करत छेडछाड केल्याचा आरोप असून या प्रकारानंतर महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये रात्री सुमारे १०.३० वाजता संबंधित तरुणी प्रवास करत होती. यावेळी एका अज्ञात इसमाने तिच्याजवळ जाऊन आपण रेल्वे अधिकारी असल्याचे सांगत तिच्याशी अयोग्य वर्तन सुरू केले. त्याने अधिकाराचा आव आणत तरुणीला धमकावल्याचेही सांगण्यात येते.
दरम्यान, वांगणी स्थानक येताच तरुणीच्या आईने आणि सहप्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्या व्यक्तीला खाली उतरवले. संतप्त प्रवाशांनी त्याला चोप दिल्यानंतर प्रकरण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ काही प्रवाशांनी चित्रित केल्याचीही चर्चा आहे.
घटनेदरम्यान रेल्वे पोलीस उपस्थित असूनही त्यांनी तातडीने हस्तक्षेप केला नसल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षाव्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘रात्री साडेदहाच्या सुमारासही महिला सुरक्षित नसतील, तर प्रवास करायचा कसा?’ असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.
या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात संबंधित इसमाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
उपनगरी रेल्वे ही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेबाबतची चिंता पुन्हा प्रकर्षाने पुढे येत आहे. केवळ गस्त वाढवण्याच्या घोषणा न करता ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी आता प्रवासी संघटनांकडून होत आहे.


