ठाणे प्रतिनिधी
बारावीची परीक्षा देण्यासाठी घरातून निघालेल्या विद्यार्थ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली. डोंबिवली येथील रहिवासी असलेला सोहम कठरे (वय १८) याचा मृतदेह कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांजवळ आढळून आला. लोकल रेल्वेतील प्रचंड गर्दीमुळे तोल जाऊन तो खाली पडल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सोहम कठरे हा डोंबिवली येथे आई-वडिलांसोबत वास्तव्यास होता. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून, तो मंगळवारी सकाळी कळवा येथे परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी लोकलने प्रवास करत होता. सकाळच्या वेळेत मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. याच गर्दीतून प्रवास करत असताना कळवा–मुंब्रा दरम्यान तोल जाऊन तो रेल्वेगाडीतून खाली पडल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी रेल्वे रुळांजवळ एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे लोहमार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने सोहम याला उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आले असून, घटनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. तसेच, घटनेच्या वेळी त्या लोकलमध्ये प्रवास करणारे प्रवासी किंवा प्रत्यक्षदर्शी यांचा शोध घेण्याचे कामही पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मोठ्या तणावात प्रवास करावा लागतो. सकाळच्या वेळेत लोकलमधील गर्दी ही जीवघेणी ठरत असल्याच्या घटना वारंवार घडत असून, या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या १८ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या अकाली मृत्यूमुळे कठरे कुटुंबावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


