मुंबई प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे पूर्व येथील गरीब नगर परिसरातील अतिक्रमण हटाव कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या तपासातून समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या चौकशीतून मुंबईतील पोलिस कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा तसेच काही महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणांवर हल्ल्याचा कट आखण्यात आल्याचे उघड झाले आहे.
काही दिवसांपूर्वी वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाजवळील गरीब नगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. या कारवाईदरम्यान सुमारे ४०० हून अधिक अवैध बांधकामे हटविण्यात आली होती. या कारवाईनंतर संबंधित घटनेचा बदला घेण्यासाठी मुंबईत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
तपासादरम्यान आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून मुंबईतील विविध ठिकाणांचे फोटो व व्हिडिओ आढळून आले आहेत. यावरून शहरातील महत्त्वाच्या भागांची रेकी करण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच परदेशातील हँडलर्सशी झालेल्या संवादाचे पुरावेही तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत.
या कटामागे पाकिस्तानस्थित गुप्तचर संस्था आयएसआय तसेच कुख्यात गुंड मुन्ना झिंगाडा आणि अन्य विदेशी सूत्रधारांचा सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे. आर्थिक मदत आणि मार्गदर्शनाच्या आधारे हा कट रचला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) सतर्क झाले असून शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. संशयितांना स्थानिक पातळीवर कोणाची मदत मिळाली का, याचाही तपास सुरू आहे. दिल्ली स्पेशल सेलच्या कारवाईमुळे मुंबईवरील संभाव्य मोठे संकट टळल्याची चर्चा सुरक्षा यंत्रणांमध्ये सुरू आहे.


