ठाणे प्रतिनिधी
भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सुवर्णपान ठरलेल्या ठाणे रेल्वे स्थानक चा १७३ वा वर्धापन दिन आज, गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. देशातील पहिल्या रेल्वे प्रवासाच्या साक्षीदार ठरलेल्या या स्थानकाच्या वाढदिवसानिमित्त विविध रेल्वे प्रवासी संघटनांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतातील पहिली रेल्वेगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे रेल्वे स्थानक या मार्गावर धावली होती. सुमारे ३३.८ किमी अंतर केवळ ५७ मिनिटांत पार करणाऱ्या या ऐतिहासिक प्रवासात ‘साहिब, सिंध आणि सुलतान’ या वाफेच्या इंजिनांनी १४ डब्यांची गाडी ओढली होती. या गाडीत सुमारे ४०० पाहुणे प्रवासी होते. भारतीय रेल्वेच्या प्रवासाची ही सुरुवात आजही अभिमानाने स्मरली जाते.
या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख आणि पदाधिकारी सुधाकर पतंगराव यांच्या पुढाकाराने आज सकाळी ११ वाजता स्थानकाच्या फलाट क्रमांक एकजवळील जुन्या रेल्वे इंजिनाजवळ मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.
कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी कृष्णा पांचाळ, आयुक्त सौरभ राव, आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांची उपस्थिती अपेक्षित आहे.
दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या ठाणे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी विविध पायाभूत प्रकल्प राबवले जात आहेत. पश्चिमेकडील सॅटीस पुलानंतर आता पूर्वेकडील सॅटीस पुलाचे कामही वेगाने सुरू असून, सुमारे २.२४ किमी लांबीचा उन्नत मार्ग, १२ मीटर रुंद मार्गिका आणि सुमारे ९ हजार चौरस मीटर डेक उभारण्यात येणार आहे. याशिवाय ११ मजली बहुउद्देशीय इमारतीत वाहनतळ, रेल्वे व बस सेवा तसेच व्यापारी संकुल उभारण्याची योजना आहे.
दरम्यान, १८५३ मध्ये सुरू झालेल्या या रेल्वे प्रवासाचा विस्तार आज देशाच्या कानाकोपऱ्यात झाला आहे. प्रारंभीची ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनी पुढे १९०० मध्ये इंडियन मिडलँड रेल्वेत विलीन झाली आणि दिल्ली, कानपूर, अलाहाबाद ते नागपूर व रायचूरपर्यंत विस्तारली. पुढे ३ फेब्रुवारी १९२५ रोजी बॉम्बे व्हीटी ते कुर्ला दरम्यान देशातील पहिली इलेक्ट्रिक रेल्वे सेवा सुरू झाली, ज्यामुळे भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाचा पाया रचला गेला.
इतिहासाचा साक्षीदार असलेले ठाणे स्थानक आजही आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना आपल्या समृद्ध वारशाची आठवण करून देत आहे.


