ठाणे प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना २००८ मधील रेल्वे भरती परीक्षेदरम्यान कल्याण रेल्वे स्थानकावर परप्रांतीय परीक्षार्थींना मारहाण झाल्याच्या प्रकरणात बुधवारी ठाणे जिल्हा न्यायालयात हजर राहावे लागले. तब्बल १८ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणातील सुनावणीदरम्यान कोर्टात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. न्यायमूर्ती अभिजित व्ही. कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांचा जबाब नोंदवताना त्यांना “तुम्हाला सगळं विचारेन तेव्हा सांगा, बोलायला संधी दिली जाईल,” असे स्पष्ट शब्दांत सांगितल्याने न्यायालयातील वातावरण अधिकच गंभीर झाले.
रेल्वे भरती प्रक्रियेदरम्यान कल्याण रेल्वे स्थानक परिसरात परप्रांतीय उमेदवारांना मारहाण झाल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांवर ठेवण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी अनेक मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले होते. त्याचप्रमाणे, राज ठाकरे यांच्या कथित भडकावू भाषणांमुळेच कार्यकर्ते आक्रमक झाल्याचा आरोप करत त्यांनाही आरोपी करण्यात आले होते.
कोर्टात नेमकं काय घडलं?
ठाणे जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होताच न्यायमूर्ती अभिजित कुलकर्णी यांनी आरोपींना हजर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज ठाकरे न्यायालयाच्या समोर जाऊन उभे राहिले.
“तुमचे नाव राज श्रीकांत ठाकरे?” असा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारला असता राज ठाकरे यांनी “हो” असे उत्तर दिले. त्यानंतर न्यायालयाने साक्षीदारांच्या जबाबांचा संदर्भ देत २००८ मध्ये परीक्षार्थींना मारहाण झाल्याचा उल्लेख केला. यावर राज ठाकरे यांनी तत्काळ “खोटं आहे…” अशी प्रतिक्रिया दिली.
न्यायालयाने पुढे शेख रहीम यांच्या फिर्यादीचा उल्लेख करत, अटक करण्यात आलेल्या आरोपी आकाश काळे याच्याकडून मनसेचे सदस्यत्व ओळखपत्र मिळाल्याचे नमूद केले. यावर राज ठाकरे यांनी “मी त्या वेळेस इथं नव्हतो…” असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायमूर्तींनी त्यांना मध्येच थांबवत “तुम्हाला सगळं विचारेन तेव्हा सांगा, बोलायला संधी दिली जाईल,” असे स्पष्ट केले.
यानंतरही राज ठाकरे यांनी “हे सगळं खोटंय,” अशी भूमिका कायम ठेवली. तपास अधिकारी अरुण जगताप यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी घेतल्याचा उल्लेख न्यायालयाने केला असता, “तत्कालीन सरकारच्या दबावाखाली खोटा गुन्हा दाखल करण्यात आला,” असा दावा राज ठाकरे यांनी केला.
तपास अधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या कथित चिथावणीखोर भाषणांच्या सीडी जप्त करून त्याचा तपासात समावेश केल्याचेही न्यायालयाने नमूद केले. त्यावर “मुळात मी तिथे नव्हतो, मी तेव्हा नाशिकमध्ये होतो,” असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले.
शेवटी न्यायालयाने त्यांचा जबाब नोंदवून सही करण्याचे निर्देश दिले.
१८ वर्षांपासून सुरू आहे सुनावणी
२००८ मध्ये रेल्वे भरती परीक्षेसाठी मोठ्या संख्येने उत्तर भारतीय उमेदवार मुंबई आणि कल्याण परिसरात आले होते. त्या काळात मनसेकडून स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याची जोरदार भूमिका घेतली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्थानक परिसरात काही उमेदवारांना मारहाण झाल्याचा आरोप झाला आणि राज्यभरात मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.
या प्रकरणाची सुरुवातीला कल्याण न्यायालयात सुनावणी झाली. नंतर प्रशासकीय कारणांमुळे प्रकरण ठाणे जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात आले. याआधीही राज ठाकरे यांना ११ मनसे कार्यकर्त्यांसह न्यायालयात उपस्थित राहावे लागले होते. मागील सुनावणीवेळी त्यांच्या वकिलांनी वारंवार वैयक्तिक उपस्थितीची गरज नसल्याचा युक्तिवाद केला होता. मात्र, पुढील न्यायालयीन प्रक्रियेअंतर्गत पुन्हा एकदा त्यांना स्वतः न्यायालयात हजर राहावे लागले.
दरम्यान, या सुनावणीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा २००८ मधील उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलनाचा मुद्दा चर्चेत आला असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


