अहमदाबाद :
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या विजेतेपदासाठी आज क्रिकेट चाहत्यांना थरारक लढतीची मेजवानी मिळणार आहे. यंदाच्या हंगामातील दोन सर्वोत्तम संघ ठरलेले रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि गुजरात टायटन्स हे संघ रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. एकीकडे गतविजेत्या बंगळूरुसमोर सलग दुसरे विजेतेपद पटकावण्याचे आव्हान आहे, तर दुसरीकडे घरच्या मैदानाचा फायदा घेत गुजरात दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाली आहे.
यंदाच्या हंगामात बंगळूरुने आपल्या आक्रमक आणि निर्भीड खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले. अनेक सामन्यांत त्यांनी २०० धावांचा टप्पा सहज पार करत फलंदाजीतील ताकद दाखवून दिली. कर्णधार रजत पाटीदारच्या शांत, संयमी आणि प्रभावी नेतृत्वाखाली संघाला स्थैर्य लाभले असून, त्याचा परिणाम अंतिम फेरीपर्यंतच्या यशस्वी वाटचालीत दिसून आला आहे. विशेष म्हणजे ‘क्वॉलिफायर-१’मध्ये बंगळूरुने गुजरातचा पराभव करत आपली ताकद दाखवून दिली होती.
दुसरीकडे गुजरात टायटन्सने सातत्यपूर्ण कामगिरी करत अवघ्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन या सलामीवीर जोडीने संपूर्ण स्पर्धेत धावांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दोघेही अव्वल स्थानी असून, त्यांच्यासोबत जोस बटलरनेही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मात्र गुजरातची मधली फळी तुलनेने कमकुवत मानली जात असल्याने गिल, सुदर्शन आणि बटलर यांच्यावरच संघाच्या फलंदाजीची मोठी जबाबदारी असेल.
गोलंदाजीत गुजरातकडे कगिसो रबाडाच्या रूपाने मोठे अस्त्र आहे. २८ बळींसह तो ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याला मोहम्मद सिराज, रशीद खान, जेसन होल्डर आणि प्रसिध कृष्णा यांची साथ लाभली आहे. नव्या चेंडूवर सुरुवातीच्या षटकांत बळी मिळवून बंगळूरुला दबावाखाली ठेवण्याचा गुजरातचा प्रयत्न असेल.
बंगळूरुची गोलंदाजीही तितकीच प्रभावी ठरली आहे. विशेषतः पॉवर-प्लेमध्ये प्रतिस्पर्ध्यांना धक्के देण्यात भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखालील आक्रमणाला यश आले आहे. २६ बळींसह भुवनेश्वर ‘पर्पल कॅप’च्या यादीत दुसऱ्या स्थानावर असून, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार आणि कृणाल पंड्या यांनीही मोलाची साथ दिली आहे. कृणालने अष्टपैलू खेळ करत संघासाठी अनेक निर्णायक क्षण निर्माण केले आहेत.
फलंदाजीत विराट कोहली हा बंगळूरुचा सर्वात मोठा आधारस्तंभ ठरला आहे. त्याला देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, टीम डेव्हिड, वेंकटेश अय्यर आणि फिट असल्यास फिल सॉल्ट यांची साथ लाभणार आहे. गेल्या सामन्यात पाटीदारने खेळलेली शानदार खेळी आणि कोहलीचे सातत्यपूर्ण प्रदर्शन पाहता बंगळूरुचे पारडे किंचित जड मानले जात आहे.
दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक मानली जाते. चेंडूला चांगली उसळी मिळत असल्याने मोठ्या धावसंख्येचा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांना चौकार-षटकारांचा वर्षाव आणि शेवटच्या षटकापर्यंत रंगणारा थरार अनुभवायला मिळू शकतो.
विशेष म्हणजे आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघ नऊ वेळा आमनेसामने आले असून, त्यात बंगळूरुने पाच तर गुजरातने चार विजय मिळवले आहेत. त्यामुळे आजची अंतिम लढत केवळ जेतेपदाचीच नव्हे, तर वर्चस्व सिद्ध करण्याचीही असणार आहे.
सामना : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु विरुद्ध गुजरात टायटन्स
स्थळ : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओहॉटस्टार ॲप.


