मुंबई प्रतिनिधी
राज्यातील धडाडीचे आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विभागात कारवाईचा अक्षरशः धडाका लावला आहे. रुजू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी राज्यभरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात व्यापक मोहीम उघडली असून, FDA च्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच दिवशी समन्वित कारवाई करण्यात आल्याची चर्चा प्रशासन वर्तुळात सुरू आहे.
२१ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत तब्बल २५ वेळा बदलीचा सामना करूनही आपल्या कठोर आणि तडफदार कार्यपद्धतीमुळे ओळख निर्माण करणारे तुकाराम मुंढे आता अन्न व औषध प्रशासन विभागातही त्याच जोमाने कामाला लागले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ३० मे रोजी राज्यातील विविध विभागांत एकाच वेळी धाडसत्र राबविण्यात आले. या मोहिमेत तब्बल ३३ आरोपींना अटक करण्यात आली असून २८ आस्थापनांवर सील ठोकण्यात आले आहे. तसेच लाखो रुपयांचा प्रतिबंधित आणि संशयास्पद माल जप्त करण्यात आला आहे.
मुंबई, कोकण, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागांत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. गुटखा, पानमसाला आणि इतर प्रतिबंधित पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई केली. या कारवाईत एकूण ६ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून दोन जणांना अटक करण्यात आली, तर कोकण विभागात सर्वाधिक कारवाई झाली.
कोकण विभागात तब्बल २० आस्थापनांवर धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईदरम्यान २१ जणांना अटक करण्यात आली असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. पुणे विभागात आठ ठिकाणी कारवाई करून आठ जणांना अटक करण्यात आली. नाशिकमध्ये एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले, तर छत्रपती संभाजीनगरमध्येही एका कारवाईत एकाला अटक करण्यात आली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील कलम २६, २७, ३० (२)(अ) आणि कलम ५९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधितांविरोधात एफआयआर नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, केवळ कारवाईवर भर न देता नागरिकांच्या सहभागातून भेसळमुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेनेही तुकाराम मुंढे यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. भेसळयुक्त अन्नपदार्थ, प्रतिबंधित पदार्थांची विक्री, औषधांमधील अनियमितता किंवा ग्राहकांची फसवणूक याबाबत तक्रार करण्यासाठी विशेष मोबाईल अॅप विकसित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना थेट तक्रार नोंदविता यावी यासाठी लवकरच टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांकही सुरू करण्यात येणार आहे.
राज्यात कुठेही भेसळयुक्त अन्नपदार्थ, प्रतिबंधित गुटखा किंवा ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या घटना आढळल्यास नागरिकांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. तुकाराम मुंढे यांच्या या धडाकेबाज मोहिमेमुळे गुटखा माफिया, भेसळखोर आणि नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.


