सातारा प्रतिनिधी
खंडाळा तालुक्यातील सुखेड गावाजवळ विहिरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणंद पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत करत चार आरोपींना अटक केली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून हा खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास सुखेड (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील चोपडे वस्ती परिसरातील विहिरीत अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचा हातपाय बांधलेला आणि अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित कारचा माग काढला. सलग तीन दिवसांच्या तपासानंतर हा खून कळंबोली येथून नियोजनपूर्वक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
मृत व्यक्तीची ओळख सोमनाथ कल्याण बोबडे (रा. सेक्टर २०, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड) अशी पटली. मुख्य आरोपीने मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून साथीदारांच्या मदतीने बोबडे यांचे अपहरण केले. त्यानंतर होंडा सिटी (एमएच-१२ डीवाय ८८४६) या कारमध्ये त्यांना जबरदस्तीने टाकून हातपाय बांधले व गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह सुखेड येथे आणून पेट्रोल ओतून जाळून विहिरीत टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या प्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) आणि २३८ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बंडू बापू भिसे (वय ४९, रा. कळंबोली, मूळ रा. दुधेबावी, ता. फलटण), विजय पोपटराव पवार (वय ३६, रा. साखरवाडी, ता. फलटण), किरण विकास गायकवाड (वय २७, मूळ रा. होळ, ता. फलटण, सध्या पुणे) आणि श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे (वय २५, मूळ रा. अंबड, जि. जालना, सध्या पुणे) यांचा समावेश आहे.
घटनास्थळी ठोस पुरावे उपलब्ध नसतानाही तपास कौशल्याच्या आधारे गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षकांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.


