मुंबई प्रतिनिधी
मुंबई : गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात मंगळवारी दुपारी भरदिवसा झालेल्या गोळीबारात १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मुख्य आरोपी महिला फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित तरुणीवर गोळी झाडण्यात आली. गोळी लागल्यानंतर तरुणी काही अंतर चालत गेली; मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे नेमके घटनास्थळ निश्चित करण्यात पोलिसांना सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागला.
प्राथमिक तपासात ही घटना वैयक्तिक वादातून घडल्याचे समोर आले आहे. मृत तरुणीचे एका विवाहित पुरुषाशी जवळचे संबंध असल्याचा संशय त्या पुरुषाच्या पत्नीला होता. या कारणावरून दोन दिवसांपूर्वी दोघींमध्ये तीव्र वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादातूनच संशयित महिलेने संतापाच्या भरात गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, मुख्य आरोपी महिला फरार आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, आरोपी महिलेकडे पिस्तूल कुठून आले आणि ते शस्त्र तिला कोणी उपलब्ध करून दिले, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. मुंबईसारख्या महानगरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात तणाव कायम आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


