मुंबई प्रतिनिधी
रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकल चोरीच्या आरोपाखाली टिळकनगर पोलिसांनी एका मराठी अभिनेत्याला अटक केली आहे. सुनील ऊर्फ रेहान सुभाष चौधरी (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो सोशल मीडियावर रील्स क्रिएटर म्हणून ओळखला जातो. पोलिसांनी त्याच्याकडून पाच रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकल जप्त केल्या आहेत.
चौधरी हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासी असून, सध्या तो पत्नीसमवेत बदलापूर पूर्व येथे वास्तव्यास आहे. त्याने काही मराठी दूरचित्रवाणी मालिका व चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या असून, सोशल मीडियावर त्याची ओळख रील स्टार म्हणून होती.
ही बाब २१ जानेवारी रोजी उघडकीस आली. कुर्ला पश्चिम येथील रहिवासी संदीप ओमप्रकाश सोनकर यांनी टिळकनगर रेल्वे स्थानकाजवळील एल. आर. उड्डाणपूल परिसरातून आपली बुलेट मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार टिळकनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष ढेमरे आणि पोलीस निरीक्षक संगम गुरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान संशय बळावल्याने बदलापूर पूर्व परिसरात सापळा रचून चौधरीला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान चौधरीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्यावर मुंबईत सुमारे १७ दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. विविध गुन्ह्यांत वापरलेल्या पाच रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकल त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून तो महागड्या दुचाकी चोरून त्या वेगवेगळ्या शहरांमध्ये विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि अभिनेता म्हणून ओळख निर्माण करून संशय टाळण्याचा प्रयत्न तो करत असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.
पुढील तपास टिळकनगर पोलीस करत आहेत.


