मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेबाबत गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावरून विविध दावे, व्हिडिओ आणि तर्क-वितर्क मांडले जात असताना, ‘अजित पवार जिवंत आहेत’ किंवा ‘अपघातात मृत्यू झालेली व्यक्ती दुसरीच होती’ असे दावेही सातत्याने पुढे येत होते. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चांना पुराव्यांसह स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला.

“दुर्दैवाने अजित दादा जिवंत नाहीत. दादा परत येणार नाहीत,” असे स्पष्ट करत रोहित पवार यांनी भावनिक आवाहन केले. अपघात अपघातच होता की त्यामागे काही घात होता, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, भावनिक आवेगातून पसरवले जाणारे अपप्रचार आणि अप्रमाणित दावे समाजात गोंधळ निर्माण करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विमानात सहा प्रवासी होते, मात्र पाच मृतदेहच बाहेर आले, याच मुद्द्यावरून संशयाचे वातावरण तयार झाले. यासंदर्भात रोहित पवार म्हणाले, “दादांचा अपघात हा स्वप्नवत भास मला सुरुवातीला होत होता. दादा आज-उद्या परत येतील, असे अनेकांना वाटत होते. खरंच तसे घडले असते, तर मी सर्वांत आधी दादांना घट्ट मिठी मारली असती. पण वास्तव स्वीकारावेच लागते.”
अपघातस्थळी पोहोचल्यानंतरची दृश्ये वर्णन करताना ते भावुक झाले. “सगळीकडे नुसती शांतता होती. कुणाच्याही तोंडातून शब्द निघत नव्हते. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते,” असे त्यांनी सांगितले. अपघातस्थळी सापडलेला अजित पवारांचा स्वेटर, तसेच त्यांचे घड्याळ पाहिल्याचा उल्लेख करत त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. “अजित दादा नेहमी आपले घड्याळ पंधरा मिनिटे पुढे ठेवत असत. अपघातानंतर त्यांच्या घड्याळात नेमके नऊ वाजलेले होते,” असे रोहित पवार म्हणाले.
या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी व्हिडिओ प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अपघाताची वेळ, घटनाक्रम आणि उपलब्ध पुरावे सादर केले. त्यांच्या मते, सकाळी ७ वाजून २ मिनिटांनी अजित पवारांच्या विमानाच्या क्रूची तयारी पूर्ण झाली होती. त्यानंतर ७ वाजून ३ मिनिटांनी बारामती परिसरातील हवामान स्थितीचा आढावा घेण्यात आला. “अपघात सकाळी साधारण ८.३० ते ८.४५ या वेळेत घडला असावा,” असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. कारण, सकाळी ९ वाजता अजित पवार गंभीर जखमी असल्याची बातमी समोर आली होती, तर ९.४५ वाजता त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती आली.
विमानाच्या तांत्रिक स्थितीवरही रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. संबंधित विमान दोन दिवस आधी सुरत येथे जाऊन आले होते, अशी माहिती त्यांनी दिली. विमानाच्या मालकाने हवामानामुळे अपघात झाला असावा, असा दावा केला असला, तरी ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमधून त्या वेळीची हवामान परिस्थिती वेगळीच असल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला. “सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर मालकाचा दावा पूर्णपणे खोटा ठरतो. यामुळे यांत्रिक बिघाडाची शक्यता अधिक ठळकपणे समोर येते,” असे रोहित पवार म्हणाले.
विमान उड्डाणापूर्वी नेहमीप्रमाणे तपासणी झाली होती का, नियमित देखभाल करण्यात आली होती का, यासारखे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“आज अजित दादा शारीरिक स्वरूपात आपल्यात नाहीत, ही वस्तुस्थिती स्वीकारावीच लागेल. मात्र, त्यांच्या विचारांमधून, त्यांच्या कामातून ते कायम आपल्यासोबत राहतील,” असे सांगत रोहित पवार यांनी आपले निवेदन संपवले.


