कन्नड प्रतिनिधी
राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘कॉपीमुक्त’ अभियानाच्या प्रभावीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना कन्नड तालुक्यात समोर आली आहे. जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर बारावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आला. या प्रकरणी तब्बल १९ पर्यवेक्षकांसह केंद्रसंचालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, ही आजवरची सर्वात मोठी धडक कारवाई मानली जात आहे.
मंगळवारी (ता. १०) इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता. या परीक्षेदरम्यान संबंधित केंद्रावर काही विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहून तसेच उत्तरांच्या झेरॉक्स प्रतींचा वापर करून गैरप्रकार करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर भरारी पथकाने तातडीने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासणीत पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या डोळ्यांदेखत विद्यार्थी कॉपी करत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
या प्रकारामुळे ‘कॉपीमुक्त’ अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, केवळ प्रत्यक्ष तपासणीपुरते मर्यादित न राहता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गैरप्रकार उघडकीस आणण्यात आल्याने प्रशासनाने कठोर संदेश दिल्याचेही चित्र आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या तपासणीत जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या पर्यवेक्षक व बैठे पथकातील अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
खासगी संस्थांशी संबंधित कर्मचाऱ्यांवर त्यांच्या संस्थांमार्फत शिस्तभंगात्मक व कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच परीक्षेची विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी संबंधित केंद्रावरील केंद्रसंचालकांसह १९ जणांचा ताफा तात्काळ बदलून त्या ठिकाणी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, परीक्षा प्रक्रियेतील जबाबदारी आणि शिस्त याबाबत प्रशासनाची कसोटी लागली असल्याची चर्चा आहे.


