परभणी प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील चिकलठाणा जिल्हा परिषद सर्कलअंतर्गत येणाऱ्या बोथ आणि बोथ तांडा या दोन गावांनी मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी मतदान प्रक्रियेवर पूर्ण बहिष्कार टाकल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. रस्ता आणि नदीवरील पूल पूर्ण होईपर्यंत मतदान न करण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम राहिल्याने, मतदानाच्या वेळेत एकही मत नोंदले गेले नाही. परिणामी दोन्ही गावांमध्ये शून्य टक्के मतदान नोंदवले गेले.
या दोन्ही गावांना वर्षानुवर्षे भेडसावणारी रस्त्याची समस्या आणि पावसाळ्यात नदी ओलांडण्याचा धोका लक्षात घेता, ग्रामस्थांनी यापूर्वीही अनेक वेळा प्रशासनाकडे मागण्या केल्या होत्या. मात्र ठोस कार्यवाही न झाल्याने, यंदा थेट लोकशाही प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा टोकाचा निर्णय ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षादल सकाळपासून मतदान केंद्रावर उपस्थित होते. प्रशासनाकडून समजूत काढण्याचे प्रयत्न झाले, मात्र ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अखेर मतदानाची वेळ संपल्यानंतर अधिकारी मतदान साहित्य घेऊन परतले. संपूर्ण दिवस मतदान केंद्र ओस पडलेले दिसत होते.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. लोकशाही प्रक्रियेत सहभाग न घेण्याचा हा निर्णय प्रशासनासाठी चिंतेचा विषय मानला जात आहे. ग्रामस्थांची एकजूट आणि त्यांच्या मागण्यांपुढे प्रशासन हतबल झाल्याचे चित्र येथे दिसून आले.
दरम्यान, मतदान बहिष्काराची दखल वरिष्ठ स्तरावर घेण्यात येईल आणि ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्ष कामाला कधी गती मिळते, याकडे बोथ आणि बोथ तांड्याच्या ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.


