प्रतिनिधी | सुधाकर नाडर
ठाणे : मुंबई व ठाणे परिसरात दीर्घकाळापासून सक्रिय असल्याचा संशय असलेली एमडी ड्रग्ज तस्कर रुबिना नियाझू शेख ऊर्फ रुबी हिला मुंब्रा पोलिसांनी २७ कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. ड्रग्ज माफियाविरोधातील ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
या प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी चार आरोपींना मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जसह अटक केली होती. चौकशीदरम्यान जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ रुबिनाशी संबंधित असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी चार दिवसांपूर्वी तिला ताब्यात घेतले. १ फेब्रुवारी रोजी तिला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिला ५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज तिला पुन्हा ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल मास्के व त्यांच्या पथकाने ठाकूरपाडा परिसरातून सुमारे २.५ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्या प्रकरणात इलियास खान, अमन खान व सैफ अली खान यांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान निलोफर नावाच्या महिलेचे नाव पुढे आले होते. तिलाही अटक करण्यात आली असून ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, रुबिना व निलोफर या गुजरातमधून १० ते २५ किलो एमडी ड्रग्ज आणून ठाण्यातील एका खोलीत त्याचे मिश्रण व पॅकिंग करत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे ड्रग्ज मुंबई व ठाणे परिसरात पुरवठा करण्यात येत असल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणात एका स्थानिक यूट्यूबरचेही नाव समोर आले असून तो तपासाच्या कक्षेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, काही भागांत आरोपीने पोलिसांशी संगनमत केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र मुंब्रा पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे कायदा आपले काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे व त्यांच्या पथकाच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.
यापूर्वीही मुंबई पोलिस व अँटी नार्कोटिक्स सेलने अनेक ड्रग्ज तस्करांविरोधात तडीपार व मोक्का सारख्या कठोर कायद्यांनुसार कारवाई केली आहे. या प्रकरणातील मोठ्या जाळ्यावर पुढे कोणती कडक कायदेशीर पावले उचलली जाणार, याकडे लक्ष लागले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


