नागपूर प्रतिनिधी
अंमली पदार्थांच्या व्यसनाने माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो, याचे धक्कादायक उदाहरण नागपुरात समोर आले आहे. एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या एका तरुणाने क्षणिक तलफ भागवण्यासाठी थेट दुचाकी चोरीचा मार्ग अवलंबल्याचा प्रकार पाचपावली पोलिसांनी उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे चोरी केलेल्या दुचाकी विकण्याऐवजी त्यामधील बॅटऱ्या काढून काळ्या बाजारात विकल्या जात होत्या.
विनय उर्फ विक्की राजबहादूर शाहू (२७, रा. बीनाकी, मंगळवारी, वंडरफुल शाळेसमोर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विनय विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. मात्र एमडीच्या व्यसनामुळे त्याचे कौटुंबिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. आधी स्वतःची दुचाकी गहाण ठेवून मिळालेले पैसे त्याने व्यसनात उडवले. त्यानंतर पैशांची चणचण भासू लागल्याने त्याने परिसरातून दुचाकी चोरीचा सपाटा सुरू केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, विनयने एकामागोमाग सात दुचाकी चोरल्या. मात्र या दुचाकी विकण्याऐवजी त्यामधील बॅटऱ्या काढून त्या काळ्या बाजारात विकल्या जात होत्या. या बॅटऱ्या विक्रीतून मिळालेल्या पैशांतून तो एमडीची तलफ भागवत होता.
असा झाला प्रकार उघड
इंदोरा परिसरातील रहिवासी सुरज मेश्राम हे पत्नी श्वेता यांच्यासह १ जानेवारी रोजी इंदोरा येथील गुरुनानक लॉनमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमानंतर बाहेर आल्यानंतर त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक रणजीत माजगावकर यांच्या लक्षात एक वेगळाच पॅटर्न आला. परिसरातून चोरीला जाणाऱ्या सुझुकी, अॅक्टिव्हा यांसारख्या मोपेडमधून केवळ बॅटऱ्या गायब होत असल्याचे आढळले. काही ठिकाणी दुचाकी जागेवरच सुरक्षित आढळल्या, मात्र त्यातील बॅटऱ्या चोरीला गेल्या होत्या.
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर एकाच व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आल्या. विशिष्ट पद्धतीने दुचाक्यांमधून बॅटरी काढून नेली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून विनयला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकी चोरी आणि बॅटऱ्यांची विक्री करून एमडीसाठी पैसे उभारल्याची कबुली दिली.
एमडीसारख्या अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यामुळे केवळ व्यक्तीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे हे प्रकरण अधोरेखित करत असल्याची प्रतिक्रिया पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली.


