गडचिरोली प्रतिनिधी
अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा अत्यंत क्रूरपणे खून करून मृतदेह जंगलात पुरल्याची धक्कादायक घटना कोरची तालुक्यात उघडकीस आली आहे. कोणतेही ठोस धागेदोरे नसताना केवळ गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सूक्ष्म तपासाच्या आधारे कोरची पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत या हत्याकांडाचा छडा लावत पत्नी आणि तिच्या प्रियकरासह पाच जणांना अटक केली आहे.
३१ जानेवारी २०२५ रोजी कोरची पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोगाटोला गावाजवळील जंगलात एका अनोळखी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृतदेह जमिनीत पुरण्यात आल्याने हा खून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. शवविच्छेदन अहवालात डोक्यावर व मानेवर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
मृतदेहाचा चेहरा पूर्णतः विद्रूप झाल्याने ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र घटनास्थळी आढळलेली रिकामी गोणी आणि मृतदेह पुरण्यासाठी वापरण्यात आलेले खोदकाम साहित्य पोलिसांच्या तपासासाठी निर्णायक ठरले. गोपनीय तपासादरम्यान २० जानेवारी रोजी जांभुळखेडा परिसरातील काही तरुण खोदकामाचे साहित्य घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे शालू पठाण याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान संशय अधिक बळावल्याने पोलिसी चौकशी केली असता शालूने गुन्ह्याची कबुली दिली. शालू पठाण याचे छत्तीसगडमधील डोंगरगड येथील सोनाली कंवर (२५) या विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. सोनालीचा पती जितू कंवर (३०) हा या संबंधांत अडथळा ठरत असल्याने त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट या दोघांनी रचल्याचे तपासात निष्पन्न झाले.
ठरलेल्या योजनेनुसार सोनालीने पतीसह सासरी जात असताना आपल्या प्रियकराला हालचालींची माहिती दिली. त्यानंतर शालू पठाण याने पुंकेश बोरकर, चंद्रशेखर गुज्जेवार आणि धनपाल मडावी यांच्या मदतीने बोगाटोला जंगलाजवळ वाहन अडवून जितू कंवर याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. मृत्यूची खात्री झाल्यानंतर आरोपींनी जंगलात खड्डा खोदून मृतदेह पुरल्याचे उघड झाले.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुलराज यांच्या मार्गदर्शनाखाली कोरचीचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे आणि त्यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


