स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : महिलांचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या सराईत चेन स्नॅचिंग आरोपीला पोलिसांनी अटक करून मुंबई व नवी मुंबईतील एकूण सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. मोहन विठ्ठल कोकाटे (वय ४९, रा. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तो अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
२४ जानेवारी रोजी एक महिला नातेवाईकांना भेटण्यासाठी रुग्णालयात जात असताना शीव येथील लायन ताराचंद हॉस्पिटलच्या गल्लीत मोटारसायकलवरील इसमाने तिचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. दक्ष नागरिकाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पीडितेचा शोध घेऊन शीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. आरोपीने ओळख लपवण्यासाठी वेषांतर केल्याचे व मोटारसायकलचा क्रमांक अस्पष्ट असल्याचे निदर्शनास आले. मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मोटारसायकलचा क्रमांक निष्पन्न करण्यात आला.
सदर मोटारसायकल ही नेरूळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असलेली असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासात सायन ते ठाणे दरम्यानच्या ७० ते ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे विश्लेषण करण्यात आले. आरोपीने वापरलेली मोटारसायकल ठाणे हद्दीतील फुटपाथवर उभी केल्याचे आढळून आले. पाळत ठेवून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपीकडून मुंबई पोलीस आयुक्तालयातील गोवंडी व सायन पोलीस ठाण्यांतील दोन, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील कोपरखैरणे, सीबीडी बेलापूर व रबाळे पोलीस ठाण्यांतील तीन असे एकूण पाच चेन स्नॅचिंगचे गुन्हे तसेच नेरूळ पोलीस ठाण्यातील एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपीवर यापूर्वीही मुंबई, नवी मुंबई व ठाणे आयुक्तालयांत एकूण २३ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) विक्रम देशमाने, परिमंडळ-४ च्या पोलीस उप आयुक्त रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (सायन विभाग) सुहास कांबळे, शीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत साळुंके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक अतुल ठोंबरे, किरण भोसले, संजय दळवी, पोलीस हवालदार संदीप जाधव, किरण चुडनाईक, परशराम धुम, पोलीस शिपाई संदीप पाटील, महेश मोकल, सुरेश बोरगे व रामजी डबडे यांनी प्रत्यक्ष तपासात सहभाग घेतला.


