नवी दिल्ली वृत्तसंस्था
राजधानी दिल्लीमध्ये हुंड्याच्या मागणीमुळे एका चार महिन्यांच्या गर्भवती महिला कमांडोचा पतीकडूनच खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकात कार्यरत असलेल्या काजल हिच्यावर तिचा पती अंकुर याने लोखंडी डंबलने हल्ला केल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल आणि अंकुर यांचे दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू असला तरी काही महिन्यांनंतर हुंड्याच्या मागणीवरून दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले. अंकुरकडून गाडी आणि पैशांची मागणी केली जात होती. यास विरोध केल्यामुळे काजलचा मानसिक व शारीरिक छळ सुरू असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
काजल २०२२ मध्ये पोलीस दलात दाखल झाली होती. तिच्या कर्तव्यनिष्ठा आणि शिस्तीमुळे तिची नियुक्ती विशेष युनिटमध्ये झाली होती. २०२३ मध्ये संरक्षण मंत्रालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या अंकुरशी तिचा विवाह झाला. दोघेही उच्चशिक्षित आणि नोकरी करणारे असले तरी कौटुंबिक तणाव दिवसेंदिवस वाढत गेला. काजलने वेगळे राहण्याचा निर्णय व्यक्त केल्यानंतर अंकुरकडून मारहाण झाल्याची माहितीही कुटुंबीयांनी दिली.
२२ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास घरात वाद झाला. त्याचवेळी अंकुरने काजलच्या डोक्यावर लोखंडी डंबलने वार केला. गंभीर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला खुनाचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र काजलचा मृत्यू झाल्यानंतर गुन्ह्यात हत्या कलमाची भर घालण्यात आली आहे. आरोपी पतीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
काजलचे वडील आणि भाऊ यांनी ही घटना केवळ एका महिलेची नव्हे, तर एका आई आणि अजन्म्या बाळाचीही हत्या असल्याची भावना व्यक्त केली. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील गनौर या तिच्या मूळ गावी या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. काजलचा मृतदेह तिरंग्यात लपेटून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांचे अश्रू अनावर झाले.
या घटनेमुळे हुंडा प्रथेविरोधात कठोर कायदेशीर पावले उचलण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.


