नवी दिल्ली वृत्तसंस्था
कर्तव्य पथावर यंदाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय सेनेच्या एका नव्या आणि वैशिष्ट्यपूर्ण तुकडीने प्रथमच लक्ष वेधून घेतले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, वेगवान हालचाल आणि त्वरित कारवाईसाठी ओळखली जाणारी भैरव बटालियन यंदा पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या भव्य परेडमध्ये सहभागी झाली. २६ जानेवारी रोजी या तुकडीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी दिली.
याआधी १५ जानेवारी रोजी जयपूर येथे पार पडलेल्या सेना दिनाच्या परेडमध्येही भैरव बटालियनने सहभाग नोंदवला होता. त्या वेळी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी परेडची सलामी स्वीकारली होती. अल्पावधीतच दोन राष्ट्रीय स्तरावरील परेडमध्ये सहभागी होणारी ही तुकडी सेनेच्या बदलत्या युद्धनीतीचे प्रतीक मानली जात आहे.
२०२५ मध्ये स्थापन झालेली नवी शक्ती
भैरव बटालियनची स्थापना २०२५ मध्ये करण्यात आली. उत्तर व पश्चिम सीमेवरील सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय सेनेने त्या वर्षी तीन नव्या रचनांची उभारणी केली होती. रुद्र ब्रिगेड, दिव्यास्त्र बॅटरी आणि भैरव बटालियन. यापैकी भैरव बटालियनला सर्वाधिक संवेदनशील आणि आव्हानात्मक भागांमध्ये तैनात करण्यात आले आहे. राजस्थानची वाळवंटे, जम्मू-काश्मीर, लडाखसारखा उंच पर्वतीय प्रदेश तसेच ईशान्य भारतातील दुर्गम भागांमध्ये ही तुकडी कार्यरत आहे.
‘फाइट टुनाईट’ची संकल्पना
भैरव बटालियनची रचना प्रामुख्याने त्वरित प्रतिसाद देणाऱ्या दलाच्या रूपात करण्यात आली आहे. अचानक उद्भवणाऱ्या संकटांना किंवा अनपेक्षित हल्ल्यांना क्षणात प्रत्युत्तर देण्याचे प्रशिक्षण या जवानांना दिले जाते. पूर्वनियोजित युद्धापेक्षा बदलत्या परिस्थितीत झटपट निर्णय घेऊन कारवाई करणे, ही या तुकडीची प्रमुख ओळख आहे. भारतीय सेनेच्या भाषेत सांगायचे तर ही बटालियन ‘Fight Tonight’ या संकल्पनेवर आधारलेली आहे.
रचना आणि विस्तार
भैरव बटालियनमधील प्रत्येक युनिटमध्ये सुमारे २५० जवान असतात. हे जवान इन्फन्ट्री, आर्टिलरी, एअर डिफेन्स आणि विविध सहाय्यक तुकड्यांमधून निवडले जातात. सध्या सुमारे १५ भैरव बटालियन कार्यरत असून, भविष्यात अशा २५ बटालियन तयार करण्याची सेनेची योजना आहे. त्यामुळे ही रचना तात्पुरती नसून सेनेच्या संरचनेचा स्थायी भाग बनत असल्याचे संकेत मिळतात.
प्रतीक, ब्रीदवाक्य आणि परंपरा
भैरव बटालियनच्या प्रतीकचिन्हात कोब्राचा समावेश आहे. ‘भैरव, अदृश्य, अदम्य’ हा संदेश देणारे हे चिन्ह शत्रूसाठी घातक ठरणाऱ्या कारवाईचे प्रतीक मानले जाते. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शब्दांत, “कोब्रा एकदा दंश केल्यावर शत्रूला सुटण्याची संधी देत नाही; भैरव बटालियनही तशीच आहे.”
भगवान शिवाच्या रौद्र रूपावरून या तुकडीचे नाव ठेवण्यात आले असून, ‘अभयम् भैरव’ हे तिचे ब्रीदवाक्य आहे. निर्भय रक्षणाची प्रतिज्ञा करणारे. यासोबतच जवानांकडून ‘राजा रामचंद्र की जय’ आणि ‘बोले सो निहाल, सत श्री अकाल’ असे पारंपरिक घोष दिले जातात, जे सेनेतील एकात्मतेचे दर्शन घडवतात.
कर्तव्य पथावरच्या परेडमधून भैरव बटालियनने केवळ शिस्तबद्ध संचलनच नव्हे, तर भारतीय सेनेच्या नव्या युद्धदृष्टीकोनाचीही झलक दाखवली आहे. वेग, तंत्रज्ञान आणि निर्भयता यांचे हे नवे रूप भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज असल्याचेच चित्र यानिमित्ताने समोर आले.


