पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील काळीज सुन्न करणारी आणि राज्य हादरवून टाकणारी घटना आज समोर आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले.
बारामती येथे विमान लँडिंगच्या वेळी झालेल्या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. डॉक्टरांचे अथक प्रयत्न अपुरे ठरले आणि महाराष्ट्राने आज एक आक्रमक, अनुभवी आणि प्रभावी राजकीय नेतृत्व गमावले.
आज सकाळी बारामती विमानतळावर उतरत असताना अजित पवार यांच्या विशेष विमानाला अचानक तांत्रिक बिघाडाचा जोरदार फटका बसला. काही क्षणांतच सगळं काही संपलं. लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीवर घसरले, जोरदार धक्का बसला आणि विमानतळावर एकच गोंधळ उडाला. या अपघातात पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर रक्ताने माखलेले, शुद्ध हरपलेले अजित पवार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयसीयूमध्ये डॉक्टरांची धावपळ सुरू होती. प्रत्येक मिनिट महत्त्वाचे होते. राज्यभरातून प्रार्थना सुरू झाल्या. मात्र काही वेळाने रुग्णालय प्रशासनाने केलेली घोषणा ऐकून राज्य स्तब्ध झाले अजित पवार यांची प्राणज्योत मालवली होती.
ही बातमी समजताच बारामतीत शोकसागर उसळला. रस्त्यांवर शांतता, डोळ्यांत अश्रू आणि चेहऱ्यांवर अविश्वास दिसत होता. मंत्रालयापासून गावागावापर्यंत एकच प्रतिक्रिया हे खरंच झालंय का?” असा प्रश्न प्रत्येकाच्या ओठांवर होता.
मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी, विरोधी पक्षनेते, सर्वपक्षीय नेते रुग्णालयात धावले. राजकीय मतभेद विसरून साऱ्यांनी एकमताने शोक व्यक्त केला. “हा फक्त एका पक्षाचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा तोटा आहे,” अशी भावना व्यक्त होत होती.
अपघात नेमका कशामुळे झाला, विमानाच्या देखभालीत हलगर्जीपणा झाला का, की तांत्रिक यंत्रणेचा गंभीर अपयश होते . यासर्व बाबींवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अजित पवार यांच्या अचानक जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. निर्णयक्षम, बसधडाकेबाज आणि स्पष्टवक्ते नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार आता केवळ आठवणींत उरले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणावर आज एक जड सावली पसरली आहे.


