भंडारा प्रतिनिधी
भंडारा जिल्ह्यातील अशोकनगर येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात गायिका व निवेदिका अंजली भारती यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून संबंधित यंत्रणांना २४ तासांच्या आत योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी अपमानास्पद व अवमानकारक शब्दप्रयोग केल्याचा आरोप अंजली भारती यांच्यावर करण्यात आला आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
भंडाऱ्यात आयोजित भीम मेळाव्यात प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना अंजली भारती यांनी महिलांवरील अत्याचार, बलात्काराच्या घटनांमध्ये आरोपींवर होत नसलेल्या कठोर कारवाईबाबत सरकारवर टीका केली. मात्र, या दरम्यान त्यांनी वैयक्तिक पातळीवर जाऊन अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे मूळ सामाजिक मुद्द्याऐवजी वादाला तोंड फुटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या प्रकरणावर भाजपकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला असून अनेक नेत्यांनी वक्तव्याचा निषेध केला आहे. समाजमाध्यमांवरूनही अंजली भारती यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
महिला आयोगाने दिलेल्या निवेदनात सार्वजनिक कार्यक्रमात कोणत्याही महिलेबाबत अपमानास्पद वक्तव्य करणे, तिच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणे हे निंदनीय असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी नागपूर विभागीय आयुक्त, भंडारा जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तात्काळ आणि कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ नुसार महिलांना संविधानाने दिलेल्या हक्कांचे संरक्षण करणे हे आयोगाचे कर्तव्य असून महिलांच्या सन्मानाला बाधा पोहोचवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वक्तव्यावर कठोर भूमिका घेतली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच, या प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल तात्काळ आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


