जयपूर :
२८ जानेवारी २०२६ची सकाळ महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हादरवणारी ठरली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली. लँडिंगपूर्वी काही अंतरावर विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. राज्यभरात शोककळा पसरली असून अपघाताच्या कारणांचा तपास करण्यासाठी संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवरच काही तासांतच देशाच्या दुसऱ्या टोकाला, जयपूरमध्ये, मोठा अनर्थ थोडक्यात टळला. दिल्लीहून जयपूरकडे येणारे एअर इंडियाचे विमान (AI-1719) दुपारी १.०५ वाजता लँडिंगसाठी उतरत असताना अनस्टेबल अप्रोचमुळे वैमानिकाने लँडिंग रद्द करत ‘गो-अराउंड’चा निर्णय घेतला. विमान धावपट्टीला स्पर्श करण्याआधीच पुन्हा हवेत झेपावले. त्या क्षणी विमानात राजस्थान काँग्रेसचे प्रभारी आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांच्यासह १३५ प्रवासी होते.
सुमारे दहा मिनिटे विमान जयपूरच्या आकाशात घिरट्या घालत राहिले. प्रवाशांमध्ये तणावाचे वातावरण होते. अखेर दुसऱ्या प्रयत्नात वैमानिकाने सुरक्षित लँडिंग करण्यात यश मिळवले आणि मोठा अपघात टळला.
गो-अराउंड म्हणजे काय?
लँडिंगदरम्यान सुरक्षितता धोक्यात असल्याचे वैमानिकाला जाणवले, तर तो विमान पुन्हा हवेत उडवतो, या प्रक्रियेला ‘गो-अराउंड’ म्हणतात. हा मानक सुरक्षा प्रोटोकॉल असून, आज जयपूरमध्ये याच निर्णयामुळे संभाव्य अनर्थ टळला.
एका बाजूला महाराष्ट्राने एका ज्येष्ठ राजकीय नेत्याला गमावल्याचा शोक, तर दुसऱ्या बाजूला विमानवाहतुकीतील तत्पर निर्णयामुळे वाचलेले जीव,या दोन घटनांनी देशाच्या राजकीय आणि सार्वजनिक आयुष्याला एकाच दिवशी हादरा दिला.


