तेलंगणा:
प्रजासत्ताक दिनानिमित्त मक्तल तहसीलदार कार्यालयात आयोजित ध्वजवंदन समारंभात सोमवारी सकाळी अनपेक्षित दुर्घटना घडली. राष्ट्रध्वज फडकावत असतानाच ध्वजस्तंभ तुटून कोसळल्याने घटनास्थळी गोंधळ उडाला. या घटनेत राज्याचे वन व पर्यावरण मंत्री वाकिती श्रीहरी थोडक्यात बचावले; मात्र काही पोलीस व अधिकारी जखमी झाले.
सकाळी सुमारे नऊच्या सुमारास राष्ट्रगीतानंतर मंत्री श्रीहरी यांनी ध्वजदोरी ओढताच लोखंडी ध्वजस्तंभ अचानक तुटला. तिरंग्यासह जड स्टीलचा खांब खाली कोसळला आणि मंत्र्यांच्या जवळ उभ्या असलेल्या काही पोलीस व अधिकाऱ्यांवर आदळला. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मंत्री थोडे अंतरावर असल्याने त्यांना इजा झाली नाही.
या घटनेने अधिकृत समारंभांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी बीआरएस नेते कोठा प्रभाकर यांच्याकडून ध्वज उलटा फडकवला गेल्याची घटना घडली होती; त्यावरूनही प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका झाली होती. राष्ट्रीय समारंभांचे गांभीर्य आणि सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित यंत्रणांना पुरेशी जाणवते का, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नवी दिल्लीत कर्तव्य पथावर झालेल्या मुख्य सोहळ्याची थीम ‘वंदे मातरम्ची १५० वर्षे’ अशी होती. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे होते.


