जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साक्री गावात सोमवारी घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला. ट्युशनसाठी घरातून निघालेल्या नववीतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचे मृतदेह गावाजवळील शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून गावावर शोककळा पसरली आहे.
लक्ष्मी अभय महाजन (वय १५) आणि नयना विजय चौधरी (वय १५) अशी मृत विद्यार्थिनींची नावे असून त्या साक्री येथील जनता हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होत्या. सोमवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे ट्युशनसाठी घरातून निघाल्या; मात्र त्या ट्युशनला पोहोचल्या नाहीत. ही बाब लक्षात आल्यानंतर पालक आणि ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सकाळी सुमारे ७.४५ वाजता एका दुचाकीवर एक तरुण आणि दोन मुली ट्रिपल सीट जाताना दिसून आले. मात्र अंतर अधिक असल्याने वाहन क्रमांक व संबंधित तरुणाची ओळख स्पष्ट होऊ शकली नाही. काही वेळातच गावाजवळील सोपान महादेव फेगडे यांच्या शेतातील विहिरीजवळ दोन्ही मुलींच्या शाळेच्या बॅगा आढळून आल्याने संशय अधिक बळावला. त्यानंतर तातडीने विहिरीत शोधकार्य सुरू करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाणे आणि बाजारपेठ शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. गावातील मुकेश कोळी यांनी विहिरीत उतरून सुमारे दीड तासाच्या प्रयत्नांनंतर दुपारी बारा वाजता लक्ष्मी महाजन हिचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर ‘बिलाई’च्या सहाय्याने शोधकार्य सुरू ठेवण्यात आले आणि दुपारी सुमारे पावणेदोनच्या सुमारास नयना चौधरी हिचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला.
दरम्यान, आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी रुग्णवाहिका अडवली. जोपर्यंत दोन्ही मृतदेह बाहेर काढले जात नाहीत आणि आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली. सकाळी नऊपासून दुपारी तीन वाजेपर्यंत परिसरात तणावपूर्ण वातावरण होते.
या प्रकरणात रोहन नरेंद्र चौधरी (रा. साक्री) या तरुणाने दोघींना विहिरीत ढकलल्याची कबुली दिल्याची माहिती असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. काही काळ परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती; मात्र पोलिसांनी संयम राखत कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले.
उल्लेखनीय बाब म्हणजे अवघ्या एक दिवस आधी, २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात या दोन्ही विद्यार्थिनींनी उत्कृष्ट नृत्य सादर केले होते. लेझीम पथक आणि वाद्यवृंदातही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या या कामगिरीबद्दल शाळा, ग्रामस्थ आणि आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला होता. आनंदात साजरा झालेल्या त्या दिवसानंतर दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या भीषण घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे.
या घटनेमुळे साक्रीसह संपूर्ण भुसावळ तालुका शोकसागरात बुडाला असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून पीडित कुटुंबांना न्याय मिळावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.


