जळगाव प्रतिनिधी
अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांना १० हजार रुपयांची कथित लाच स्वीकारताना अटक झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांच्या जळगाव येथील राहत्या घरावर टाकलेल्या झाडाझडतीत सुमारे २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, सोने खरेदीच्या पावत्या, घरातील मौल्यवान वस्तू आणि विविध ठिकाणच्या मालमत्तेची कागदपत्रे असा मोठा ऐवज या कारवाईत समोर आला असून, जळगाव जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठ्या एसीबी कारवायांपैकी एक मानली जात आहे.
नाशिक आणि जळगाव येथील एसीबीच्या संयुक्त पथकाने चौधरी यांच्या जळगावस्थित निवासस्थानी ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती केली. कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मोठ्या प्रमाणात सापडलेल्या रोख रकमेची मोजणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना अनेक तास लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वी अकोला येथे १० हजार रुपयांची कथित लाच स्वीकारल्याप्रकरणी चौधरी यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानंतर त्यांच्या मालमत्तेची पडताळणी करण्यासाठी एसीबीने पुढील कारवाई सुरू केली.
दरम्यान, चौधरी यांच्या जळगावातील सीलबंद घरात काही नातेवाईकांनी प्रवेश करून घरफोडीचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी संबंधितांना रंगेहाथ ताब्यात घेतल्यानंतर घर पुन्हा सीलबंद करण्यात आले असून परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
झाडाझडतीत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :
१ कोटी ५३ लाख ८४ हजार ६३० रुपयांची रोख रक्कम
४२२.१०० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ६० लाख ५७ हजार १३५ रुपये)
१५४.५०० ग्रॅम चांदीचे दागिने (किंमत ३१ हजार ४१६ रुपये)
११ लाख ५२ हजार ७४५ रुपयांच्या सोने खरेदीच्या पावत्या
६ लाख २५ हजार ५४५ रुपयांच्या घरातील मौल्यवान वस्तू
६२ लाख १३ हजार ३७६ रुपये किमतीच्या स्थावर मालमत्तेची कागदपत्रे
एसीबीने जप्त केलेल्या संपत्तीच्या स्रोतांचा तपास सुरू केला असून, चौधरी व त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक व्यवहारांचीही छाननी केली जात आहे. तपासाच्या निष्कर्षांनुसार या प्रकरणात आणखी गुन्हे किंवा कायदेशीर कारवाईची शक्यता नाकारता येत नसल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.


