जळगाव प्रतिनिधी
पाणीपुरी खाताना झालेल्या ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधात झालं आणि पुढे त्याचा शेवट भीषण हत्येत झाला. पद्मालय (ता. एरंडोल) परिसरातील जंगलात एका तृतीयपंथीयाची हत्या करून मृतदेह जाळल्याप्रकरणी स्वप्नील उर्फ गोलू अशोक पाटील (२१, रा. पहुर) याला पोलिसांनी अटक केली आहे.
स्वप्नील आणि आकांक्षा उर्फ अजय हेमराज गद्रे (रा. छत्तीसगड; सध्या सुरत) यांची ओळख काही महिन्यांपूर्वी नाशिक येथे पोलीस भरती अकादमीबाहेरील एका पाणीपुरीच्या ठेल्यावर झाली होती. मोबाईलवर संवाद सुरू झाल्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. काही काळानंतर आकांक्षा ही तृतीयपंथी असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्वप्नीलने संबंध तोडण्याचा प्रयत्न केला.
मात्र आकांक्षाने लग्नाचा आग्रह धरत स्वप्नीलचा पाठपुरावा सुरू ठेवला. ती त्याच्या घरीही आली होती. वारंवार होणाऱ्या दबावामुळे वाद वाढत गेला.
३१ जानेवारी रोजी आकांक्षा सुरतहून जळगावला आली. दोघे पद्मालय येथे गेले. गणपती दर्शनानंतर जंगलात चर्चा सुरू असताना पुन्हा लग्नाचा विषय निघाला. त्यावेळी झालेल्या झटापटीत आकांक्षा खाली पडली. अर्धमेलेल्या अवस्थेत तिच्याच ओढणीने गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. मृत्यूची खात्री केल्यानंतर स्वप्नीलने पेट्रोल टाकून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
४ फेब्रुवारी रोजी पद्मालय वनपरिक्षेत्रात अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसाठी आव्हान ठरले. मात्र पायाच्या नखावरील मॅजेंटा रंगाची नेल पॉलिश आणि नाकातील सोन्याची मुरनी हा महत्त्वाचा धागा ठरला. फॉरेन्सिक अहवाल व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी स्वप्नीलला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, ही घटना प्रेमसंबंधांतून निर्माण होणाऱ्या असहिष्णुतेचे गंभीर परिणाम अधोरेखित करणारी ठरली आहे.


