जळगाव प्रतिनिधी
राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप, धार्मिक ध्रुवीकरण आणि वादग्रस्त वक्तव्यांनी राजकीय वातावरण तापले असताना, जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात घडलेली एक घटना मात्र समाजाला अंतर्मुख करणारी ठरली आहे. धर्माच्या चौकटीपलीकडे जाऊन माणुसकी आणि आपुलकी जपणाऱ्या या घटनेने हिंदू-मुस्लिम ऐक्याचं अस्सल चित्र समाजासमोर ठेवलं आहे.
यावल शहरातील बारी वाडा परिसरात राहणाऱ्या देवरे-सोनार कुटुंबात गेली तब्बल ८० वर्षे वास्तव्यास असलेले कय्युम खान नूर खान यांचे वयाच्या १०० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. विशेष बाब म्हणजे, त्यांचा जनाजा थेट त्या हिंदू कुटुंबाच्या घरातूनच मुस्लिम रीतिरिवाजानुसार काढण्यात आला. या अंत्ययात्रेत शहरातील विविध समाजघटकांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वयाच्या विसाव्या वर्षी सुरू झालेला सहवास
कय्युम खान हे अवघ्या २० व्या वर्षी देवरे-सोनार कुटुंबाकडे सराफा कारागीर म्हणून कामाला आले. पुढील आठ दशके त्यांनी अशोक देवरे-सोनार, ज्योती देवरे-सोनार आणि ऋषी देवरे-सोनार यांच्या कुटुंबासोबतच आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. काळाच्या ओघात कामगार आणि मालकाचं नातं मागे पडून ते कुटुंबातील एक अविभाज्य घटक बनले.
देवरे-सोनार कुटुंबीयांनी कय्युम खान यांना कधीही परकेपणाची जाणीव होऊ दिली नाही. आजारपण, वृद्धापकाळ, दैनंदिन गरजा – सर्व बाबतीत कुटुंबीयांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली. परिसरातही ते ‘घरचे आजोबा’ म्हणूनच ओळखले जात होते.
भावनिक विनंती आणि मानवी निर्णय
कय्युम खान यांच्या निधनानंतर त्यांच्या मूळ कुटुंबीयांनी (काजीपुरा भागातील) मुस्लिम परंपरेनुसार अंत्यविधीची तयारी सुरू केली होती. मात्र देवरे-सोनार कुटुंबीयांनी भावनिक साद घालत एक आगळीवेगळी विनंती मांडली.
“आजोबांचं संपूर्ण आयुष्य आमच्या घरात गेलं आहे. त्यामुळे मुस्लिम पद्धतीने का होईना, त्यांचा जनाजा आमच्या घरातूनच निघावा,” अशी विनंती त्यांनी केली. पुणे व मुंबई येथे वास्तव्यास असलेली त्यांची मुले, मुली आणि जावई अंतिम दर्शनासाठी येणार असल्याने एका दिवसाचा अवधी देण्याची मागणीही करण्यात आली.
कय्युम खान यांच्या कुटुंबीयांनी ही भावना समजून घेत विनंती मान्य केली. त्यानंतर देवरे-सोनार यांच्या घरातूनच मुस्लिम रीतिरिवाजानुसार जनाजा काढण्यात आला.
समाजाला संदेश देणारी घटना
या घटनेने यावल शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भावनिक वातावरण निर्माण झाले. राजकीय आणि धार्मिक मतभेदांच्या पलीकडे जाऊन मानवी नातेसंबंध किती घट्ट असू शकतात, याचं हे उदाहरण असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
मयत कय्युम खान यांच्या पश्चात दोन पुतणे – शिक्षक सादिक खान शाकीर खान आणि जाकीर खान शाकीर खान – असा परिवार आहे.
धर्म, जात किंवा राजकीय ओळखींपेक्षा माणुसकी मोठी असते, हे सांगणारी ही घटना सध्याच्या तणावग्रस्त सामाजिक वातावरणात आश्वासक ठरते. अशा प्रसंगांमधूनच सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकतेची खरी बीजं रुजत असल्याचं चित्र यावलमध्ये दिसून आलं.


