संभाजीनगर प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी मोहिमेला वेग आला असून, धाराशिव तालुक्यातील देवळाली शिवारात ‘अँटी नारकोटिक्स सेल’ने टाकलेल्या छाप्यात गांजाची अवैध शेती उघडकीस आली. या कारवाईत सुमारे १६ लाख रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, संबंधित शेतमालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
देवळाली परिसरातील एका शेतात कपाशी अथवा तुरीच्या पिकात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थविरोधी पथकाने खातरजमा करून छापा टाकला. यावेळी पूर्ण वाढ झालेली गांजाची झाडे आढळून आली. ही झाडे विक्रीसाठी तयार असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी शेतातून गांजाची हिरवीगार झाडे मुळासकट उपटून जप्त केली. जप्त मुद्देमालाचे वजन आणि बाजारभावानुसार त्याची किंमत अंदाजे १६ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शेतमालकाविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.
अमली पदार्थांची शेती व विक्री हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. जिल्हा ‘ड्रग फ्री’ करण्याच्या उद्देशाने नागरिकांनी संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. या गांजाची पुरवठा साखळी नेमकी कुठे होती आणि आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.


