मुंबई प्रतिनिधी
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा झाली. ठाकरे बंधूंच्या एकत्रित व्यासपीठावरून भाजपावर जोरदार टीकेची झोड उठवण्यात आली. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या हिंदुत्व, विकास आणि मुंबईविषयीच्या भूमिकेवर कठोर शब्दांत हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे यांनी भाजपाचं हिंदुत्व हे “ढोंग” असल्याचा आरोप करत, मराठी अस्मिता, मातृभाषा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास अधोरेखित केला. “मराठीचं आणि मातृभाषेचं प्रेम रक्तात असावं लागतं,” असं सांगत त्यांनी ठाकरे घराण्याचा वैचारिक वारसा मांडला.
‘संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनसंघ कुठेच नव्हता’
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले की, “आचार्य अत्रे, एस. एम. जोशी आणि प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या नेत्यांनी हा लढा उभारला. त्या वेळी मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून सर्व पक्ष एकत्र आले होते. मात्र जनसंघ शेवटी आला आणि सर्वात आधी बाहेर पडला.” आज महाराष्ट्राचे आणि मुंबईचे तुकडे होत असताना ठाकरे गप्प बसतील, असा भाजपाचा गैरसमज असल्याचा टोला त्यांनी लगावला.
‘निवडणूक आली की भाजपाचं रुंभा-सुंभा’
भाजपाच्या निवडणूक राजकारणावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “प्रत्येक निवडणुकीत भाजपा हिंदू-मुस्लिम, मराठी-अमराठी असा रुंभा-सुंभा खेळते.” देवेंद्र फडणवीस यांच्या ‘विकासावर भाषण दाखवा आणि हजार रुपये घ्या’ या आव्हानालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. “मला चोराचा पैसा नको,” असं म्हणत ठाकरे यांनी फडणवीसांना उलट आव्हान दिलं – “हिंदू-मुस्लिम न करता केलेलं एक तरी भाषण दाखवा, मी तुम्हाला एक लाख रुपये देतो.”
‘भाजपाचं हिंदुत्व आणि देशप्रेम दोन्ही ढोंग’
उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या राष्ट्रवादावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “ढोंगावर लाथ मारायची शिकवण मला घरातून मिळाली आहे,” असं सांगत त्यांनी पहलगाम हल्ल्यानंतरच्या घडामोडींचा संदर्भ दिला. “ऑपरेशन सिंदूरनंतर काही दिवसांतच शाह यांचे चिरंजीव पाकिस्तानसह क्रिकेट सामने आयोजित करतात. हे यांचं हिंदुत्व आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘मुंबई अदाणीच्या हाती देण्याचा डाव’
मुंबई महापालिकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी भाजपाचा डाव असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले की, “सगळीकडे अदाणीकरण सुरू आहे. आमची मुंबई परत ‘बॉम्बे’ करण्याचा प्रयत्न चालू आहे.” मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा दाखला देत त्यांनी सांगितलं की, “सोन्यासारख्या मुंबईच्या ठेवी ९२ हजार कोटींवरून ७० हजार कोटींवर आणल्या गेल्या. तीन लाख कोटींचा घोटाळा भाजपा आणि गद्दारांनी केला आहे.”
‘तुम्ही मोदींचे बँडवाले, आमचा ब्रँड संपणार नाही’
भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले, “मोदींना अतिरेकी म्हणणारे चालतात, पण शिवसेना नको. कारण शिवसेना जिवंत आहे तोपर्यंत मुंबई गिळता येणार नाही.” याच संदर्भात त्यांनी ठामपणे सांगितलं, “अरे, तुम्ही मोदींचे बँडवाले आहात. आमचा ब्रँड कसा काय संपवणार?” ठाकरे आणि शरद पवार ही दोन नावं पुसण्याचा डाव असल्याचं सांगत, “हे संपले तर मराठी माणूस उभा राहणार नाही, असं यांना वाटतं,” असा आरोपही त्यांनी केला.
शिवाजी पार्कवरील या सभेत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महापालिका निवडणुकांच्या राजकारणात नवा रंग भरला असून, मराठी अस्मिता आणि मुंबईच्या भवितव्यावरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.


