मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर आणि उद्योगपती गौतम अदानी समूहावर जोरदार टीका केली. महाराष्ट्राच्या आर्थिक आणि भौगोलिक हितांवर घाला घालण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप करत राज ठाकरे यांनी सभेत विशेष चित्रफित सादर केली. ही चित्रफित पाहून क्षणभर संपूर्ण शिवाजी पार्कमध्ये सन्नाटा पसरला.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आशीर्वादाने गौतम अदानी समूह देशभरात कसा पसरत चालला आहे आणि एकाधिकारशाही निर्माण करत चालला आहे हे समजून घ्यावंच लागेल. याची ही चित्रफीत…. जरूर पहा…
भारतात अदानी २०१४ – २०२५#मुंबई #महाराष्ट्र #BMC pic.twitter.com/Tz3hdsvlm3
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) January 11, 2026
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई व एमएमआर परिसरावर पुन्हा एकदा डोळा ठेवला जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. सरकारपुरस्कृत उद्योगपतींना पुढे करून महाराष्ट्रद्वेषी मानसिकतेतून एमएमआर परिसर हळूहळू ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. “मराठी माणसांनी ज्या त्वेषाने संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला, त्याचा राग आजही काही सत्ताधाऱ्यांच्या मनात आहे. त्या रागातूनच महाराष्ट्राच्या जमिनी, बंदरे, विमानतळे आणि महत्त्वाचे प्रकल्प एका विशिष्ट उद्योगसमूहाच्या घशात घातले जात आहेत,” असे राज ठाकरे म्हणाले.
सभेत दाखवण्यात आलेल्या चित्रफितीत अदानी समूहाने देशभरात, विशेषतः महाराष्ट्रात, कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर जमिनी आणि प्रकल्प मिळवले, याचा तपशील मांडण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयांमुळे उद्योगांच्या नावाखाली व्यावसायिक एकाधिकारशाही कशी उभी राहत आहे, यावर राज ठाकरे यांनी बोट ठेवले. “ही चित्रफित पाहूनही जर मराठी माणूस अस्वस्थ झाला नाही, तर आपल्यावर होणारे शोषण अटळ आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भावाच्या भाषणाचे उघडपणे कौतुक केले. “राज ठाकरे यांनी पोटतिडकीने मांडणी केली आहे. ही चित्रफित पाहून मराठी माणसांच्या डोक्यात तिडीक गेली नाही, तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्या सादरीकरणामुळे ‘आपल्यासोबत नेमके काय घडते आहे’ हे मराठी माणसाला समजले असेल, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांचा संदर्भ देत थेट राजकीय आवाहन केले. “मुंबई आणि महाराष्ट्र आपल्या हातून जाऊ द्यायचा नसेल, तर येत्या १५ तारखेला इंजिन, मशाल आणि तुतारीचे बटन दाबा,” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
सभेचा रोख केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांवर केंद्रित होता. अदानी समूहाच्या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील संसाधने, जमिनी आणि सार्वजनिक मालमत्ता काही मोजक्या हातात एकवटत असल्याचा आरोप करण्यात आला. उद्योगविकासाच्या नावाखाली तयार होत असलेली ही एकाधिकारशाही भविष्यात मराठी माणसासाठी घातक ठरेल, असा सूर दोन्ही ठाकरे बंधूंनी लावला.
एकंदरच, शिवाजी पार्कवरील ही सभा केवळ राजकीय शक्तिप्रदर्शन न राहता महाराष्ट्राच्या अस्मितेचा, आर्थिक स्वायत्ततेचा आणि मराठी माणसाच्या हक्कांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवणारी ठरली. राज ठाकरे यांच्या चित्रफितीने आणि आक्रमक मांडणीने उपस्थितांमध्ये अस्वस्थ शांतता पसरवली, तर उद्धव ठाकरे यांच्या शब्दांनी त्या अस्वस्थतेला थेट राजकीय दिशाही दिली.


